नागपूर : शासकीय असो वा खासगी तिथल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्या दिल्या जातात. मात्र, हत्तींनाही अशा सुट्या मिळतात, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. राज्यशासनाचा पहिला ‘हत्ती कॅम्प’ गडचिरोली जिल्ह्यात आहे. या हत्ती कॅम्पला ५७ वर्ष पूर्ण झाली आहेत. या हत्ती कॅम्पमधील हत्तींना दरवर्षी १२ दिवसांच्या वैद्यकीय सुट्या दिल्या जातात.
गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे शासकीय हत्ती कॅम्प आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा कॅम्प कधीकाळी नक्षलवाद्यांचा गड होता. त्याचा फटका या कॅम्पला देखील बसला आहे. तरीही या शासकीय हत्ती कॅम्पने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. दूरदूरुन लोक हत्तींना पाहण्यासाठी येतात. सिरोंचा वनविभागाअंतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रातील हत्ती कॅम्पमध्ये सध्या नऊ हत्ती आहेत.
हिवाळ्यात वाढत्या थंडीमुळे हत्तींच्या तळपायांना भेगा पडतात. त्यांना चालताना त्रास होतो. त्यामुळे त्या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर उपचारसाठी दरवर्षी त्यांना वैद्यकीय सुटी देण्यात येते. यावेळी त्यांचा पायांना ‘चोपींग’ औषधांचा शेक दिला जातो. ४० ते ४५ प्रकारच्या जडीबुटींपासून हे औषध तयार केले जाते. त्यासाठी हिरड, बेहडा, सुंठ, त्रिफळा, जायफळ, आसमंतारा अशा वेगवेगळ्या मवनस्पतींचा वापर करून एका ड्रम मध्ये चोपिंग चा लेप तयार करतात. तो लेप तयार करून सकाळच्या पहाटेला व सायंकाळी हत्तीचे पाय शेकतात.
महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प पाहण्यासाठी कमलापुर हत्ती कॅम्पला अनेक पर्यटक येत असतात. पण सध्या १० ते १२ दिवसांसाठी हा कॅम्प बंद असून हत्ती सध्या उपचारासाठी सुट्टीवर आहेत. दहा दिवस चालाणाऱ्या या ‘चोपिंग’ प्रक्रियेत हत्तींची विशेष काळजी घेतली जाते. यावेळी त्यांच्या प्रकृतीची तपासणी व रक्त तपासणी देखील केली जाते. कमलापूर येथे सध्या अजित, बसंती, रूपा, मंगला, राणी, प्रियांका, गणेश, लक्ष्मी आणि कुसूम असे नऊ हत्ती आहेत. कमलापूरचा हा हत्ती कॅम्प राज्याचा एकमेव हत्ती कॅम्प असला तरीही सातत्याने या कॅम्पकडे राज्याच्या वनखात्याचे दुर्लक्ष होताना दिसून येते. राज्यातील हा पहिला आणि एकमेव हत्ती कॅम्प असताना चाराकटर, माहूत अशी पदभरती तसेच पशुवैद्यक पदभरतीकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.
कमलापूरप्रमाणेच मेळघाटातही हत्तींना वैद्यकीय रजा दिली जाते. मेळघाट व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत कोलकास येथील हत्ती रजेवर जातात. याठिकाणी देखील सुंदरमाला, चंपाकली, लक्ष्मी आणि जयश्री नावचे हत्ती आहेत. जेव्हा या हत्तींना रजा दिली जाते, तेव्हा हत्तीसफारी पूर्णपणे बंद राहते.

