नागपूर: नागपूर जिल्ह्यातील कामठी मधील मुख्य बाजारपेठेत दोन दुकानदारांमध्ये फिल्मिस्टाईल तुफान हाणामारीची घटना घडली आहे.
कामठी येथील बाजार परिसरात मंगळवारी घडलेल्या या घटनेने परिसरात एकच गोंधळ आणि तणाव निर्माण झाला. धक्कादायक बाब म्हणजे हाणामारीवर उतरलेल्या या दोन्ही दुकानदारांनी रस्त्यांवर अतिक्रमणे करत आपापल्या दुकानाचा विस्तार केला होता.

कामठी परिसरातील मुख्य बाजारात अतिक्रमणांचा मुद्दा एरणीवर आला आहे. मात्र मधल्या काळात निवडणूकांमुळे अतिक्रमणांचा मुद्दा लांबला होता. मतांवर डोळा ठेवून असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला होता. आता नगर पालिकेची निवडणूक आटोपली आहे. त्यामुळे कामठी नगर पालिकेने गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात बाजार परिसरात अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली आहे.

परिसरातील रस्त्यांवरचे अतिक्रमण हटवण्यासाठी आलेले नगर पालिकेच पथक दुकाने बाजूला करत असताच दोन दुकानदारांमध्ये वादाला सुरूवात झाली. अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांसमोरच हा वाद वाढत गेला. नगर पालिकेचे अधिकारी आणि पोलीस हजर असतानाच दोन्ही दुकानदारांत हाणामारी सुरू झाली. मुळात दोन्ही दुकानदारांनी अतिक्रमण केले होते.

मात्र नेमके कोणाचे अतिक्रमण हटवले जाणार यावरूनच दोघांमध्ये वाद होता. या हाणामारीनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही दुकानदारांना ठाण्यात आणले. तिथे दुकानदारांची एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मात्र सध्या दोन्ही दुकानदारांमधील हाणामारीचा हा व्हीडीओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे..