नागपूर : विद्यार्थ्यांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्यांच्या निषेधार्थ नागपुरात एनएसयूआय कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. कंगना राणावत तसेच केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
बर्डी मेट्रो स्टेशन परिसरात आंदोलन
विद्यार्थ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) च्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी नागपुरातील बर्डी मेट्रो स्टेशन (मुंजे चौक) परिसरात जोरदार आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी अभिनेत्री आणि खासदार कंगना रानावत तसेच केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कंगना यांच्या वक्तव्यांचा निषेध
विद्यार्थी आंदोलने आणि युवकांच्या प्रश्नांवर भाष्य करताना कंगना रानावत यांनी विद्यार्थ्यांचा उल्लेख कथितरीत्या ‘जेनरेशन गटर’ आणि ‘गटर छाप’ अशा शब्दांत केल्याचा आरोप एनएसयूआयकडून करण्यात आला आहे. तसेच महिला आंदोलनकर्त्यांविषयी ‘ड्रग्स, दारू आणि बॉडी काउंट’ यांसारखी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचाही आरोप करण्यात आला. या वक्तव्यांचा निषेध करत विद्यार्थ्यांनी सार्वजनिक माफीची मागणी केली. एनएसयूआयच्या राष्ट्रीय सचिव वैष्णवी भारद्वाज यांनी सांगितले की, देशातील विद्यार्थी नीटमधील जागा वाढविणे, वाढती शैक्षणिक फी, बेरोजगारी आणि शिक्षणाच्या खासगीकरणासारख्या गंभीर मुद्द्यांवर आवाज उठवत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी त्यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्ये करून त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पोलिसांशी धक्काबुक्की
आंदोलनादरम्यान एनएसयूआय कार्यकर्ते आणि पोलिस प्रशासन यांच्यात काही काळ तणाव निर्माण झाला. बर्डी मेट्रो स्टेशनजवळ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की तसेच शाब्दिक चकमक झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचार आणि लाठीमार तात्काळ थांबविण्याची मागणी केली. शिक्षण व्यवस्थेतील अडचणी सोडविण्याऐवजी विद्यार्थ्यांवर दडपशाही का केली जात आहे, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी भूमिका एनएसयूआय पदाधिकाऱ्यांनी मांडली.
नीट आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर तोडगा मागितला
विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली. विशेषतः नीट आणि वैद्यकीय प्रवेशातील जागांचा प्रश्न, शैक्षणिक शुल्कवाढ तसेच बेरोजगारी या मुद्द्यांवर सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात एनएसयूआयचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये अजीत सिंह, वैष्णवी भारद्वाज, निलेश खोरगडे, मुरली साहू, आशीष मंडपे, प्रणय सिंह ठाकूर, आयुष नवले, विद्यासागर त्रिपाठी, लोकेश फुलजले, इमरान शेख, जैनुएल ओवेस आणि यश इंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
