नागपूर : शनिवारी असलेल्या सुटीमुळे कळमना परिसरातील ३५ जण देवदर्शनासाठी केळवद परिसरातील कपिलेश्वराच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र तरुणाच्या अती उत्साही स्वभावामुळे संपूर्ण कुटुंबावर पश्चाताप करण्याची वेळ शनिवारी ओढवली. दर्शनासाठी अंघोळीसाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाचा खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. केळवद ग्रामीण पोलीस हद्दीतील कपिलेश्वर संगमावर शनिवारी दुपारी दिडच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
यश भोलाशंकर राठोड (१९) रा. कळमना असे कपिलेश्वर मंदिर संगमावर बु़डालेल्या तरुणाचे नाव आहे. कळमना परिसरातील ३५ जणांनी शनिवारी पिकनिकसाठी योजना केली. त्या नुसार सकाळी यश हा आपली आई शिवा आणि बहिण स्वातीसह कपिलेश्वरच्या दर्शनासाठी गेले. दर्शन घेतल्यानंतर यश याला पाण्यात उतरण्याचा मोह झाला. कपडे काढून त्याने पाण्यात उडी घेतली. मात्र खोलीचा अंदाज न आल्याने यश लगेच गटांगळ्या खाऊ लागला. हे पाहून परिसरातील नागरिकांनी आरडाओरड सुरू केली.
लगेच काही जणांनी हितज्योती आधार फाउंडेशनचे हितेश बनसोड यांना माहिती दिली. त्यांनी केळवद पोलीस ठाण्याला सुचना केली. त्याच वेळी गस्तीवर निघालेले केळवदचे ठाणेदार आशिष सिंह ठाकूर, मेजर सुधीर यादगिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ठाणेदारांनी स्वतः मारली उडी
अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोचलेले ठाणेदार ठाकूर यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून जीवावर उदार होत पाण्यात उडी घेतली. चांगले पोहता येत असल्याने ठाणेदार ठाकूर यांनी खोल बुडालेल्या यश राठोडला बाहेर काढले. मात्र, नाकातोंडात पाणी गेल्याने मुलाला तत्काळ सावनेर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून मुलाला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पिकनिकसाठी गेलेल्या कुटुंबावर मुलाच्या अतिउत्साहामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

