नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर होणारे संचलन हे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचेच आकर्षण असते. विविध राज्यांची संस्कृती, कला, परंपरा उलगडणारे चित्ररथ, प्रशासनाच्या कार्याचा आढावा देणारी पथके आणि देशाच्या सुरक्षा यंत्रणांकडून सादर होणारी थरारक प्रात्यक्षिके पाहण्यासाठी देश-विदेशातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे दरवर्षी संचलनात काहीतरी वेगळे, नवे सादर करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही सोमवारी होणाऱ्या या संचलनामध्ये अनेक उल्लेखनीय चित्ररथ आणि पथके पाहायला मिळणार असून, त्यातील एक प्रमुख आकर्षण असणार आहे ते भारतीय लष्कराचे प्राणी-पक्षी पथक.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, रणगाडे आणि जवानांची शिस्तबद्ध प्रात्यक्षिके संचलनात दिसणार आहेतच; मात्र यंदा लष्कराच्या ताफ्यात रिमाउंट अँड व्हेटरनरी कोअर (RVC) या शाखेतील अनोखे ‘मूक योद्धे’ सहभागी होत आहेत. या पथकात दोन मदार असलेले बॅक्ट्रियन उंट, झांस्करी घोडे, शिकारी पक्षी तसेच भारतीय श्वान जातींचा समावेश आहे. देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या या प्राण्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांना कर्तव्यपथावर स्थान देण्यात आले आहे.

युद्धभूमीवरील प्राण्यांची परंपरा

युद्धात किंवा संरक्षणासाठी प्राणी-पक्ष्यांचा वापर ही संकल्पना नवी नाही. प्राचीन काळापासून विविध संस्कृतींमध्ये प्राण्यांची कौशल्ये ओळखून त्यांचा युद्धनीतीत वापर केला गेला आहे. संदेशवहनासाठी कबुतरे, हेरगिरीसाठी शिकारी पक्षी, तर समुद्रात डॉल्फिनसारख्या प्राण्यांचा वापर झाल्याची उदाहरणे इतिहासात आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही काही मोहिमांमध्ये मधमाश्यांचा वापर केल्याचे उल्लेख सापडतात.

हिमालयापासून वाळवंटापर्यंत योगदान

भारतीय लष्करामध्ये आजही प्राण्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हिमालयातील दुर्गम, उंच भागांमध्ये रसद, इंधन आणि शस्त्रास्त्रे पोहोचवण्यासाठी खेचरांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. एकदा मार्ग शिकला की तो न विसरणारी त्यांची क्षमता जवानांसाठी मोलाची ठरते. अशाच एका खेचराची – ‘पेडोंगी’ – शौर्यगाथा आजही लष्करात सांगितली जाते.

बॅक्ट्रियन उंट आणि झांस्करी घोडे

यंदाच्या संचलनात विशेष लक्ष वेधून घेणार आहेत बॅक्ट्रियन उंट. लडाखसारख्या १५ हजार फुटांहून अधिक उंचीवरील, उणे तापमानाच्या प्रदेशात हे उंट २५० किलोपर्यंत ओझे वाहू शकतात. ऑक्सिजनची कमतरता असलेल्या भागातही ते सहज तग धरतात. त्यांच्या सोबतीला असणारे झांस्करी घोडेही अतिशय प्रतिकूल हवामानात चपळाईने काम करतात.

‘एअर वॉरियर्स’ – आकाशातील नवे रक्षक

आधुनिक युद्धतंत्रामध्ये ड्रोनचा वाढता वापर लक्षात घेता, लष्कराने शिकारी पक्ष्यांचे विशेष पथक तयार केले आहे. ‘एअर वॉरियर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पथकात घार आणि ससाण्यांचा समावेश आहे. आकाशात उडणारे शत्रूचे ड्रोन पाडण्याचे प्रशिक्षण या पक्ष्यांना देण्यात आले आहे. ‘अर्जुन’ नावाची घार या पथकाची प्रमुख असून, तिच्या डोक्यावर अतिशय हलका कॅमेरा बसवण्यात आला आहे.

स्वदेशी श्वान जातींचा अभिमान

लष्कराच्या श्वान पथकात आता स्वदेशी जातींना प्राधान्य दिले जात आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत मुधोल हाउंड, राजापालयम, कोम्बाई, चिप्पीपाराई आणि रामपूर हाउंड यांसारख्या भारतीय श्वान जातींचे प्रशिक्षण सुरू आहे. दहशतवादविरोधी मोहिमा, स्फोटकांचा शोध आणि बचावकार्यांत ही श्वाने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

मूक योद्ध्यांचा सन्मान

कर्तव्यपथावरील हे प्राणी-पक्षी पथक केवळ एक आकर्षक प्रदर्शन नसून, पडद्यामागे कार्यरत असलेल्या असंख्य मूक योद्ध्यांच्या योगदानाचा सन्मान आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी, भारताच्या भौगोलिक रचनेत आणि संरक्षण व्यवस्थेत प्राण्यांचे महत्त्व आजही अनन्यसाधारण असल्याचे या संचलनातून अधोरेखित होणार आहे.