नागपूर : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी अजमल कसाब आणि ‘बिर्याणी’ हा वादग्रस्त किस्सा आजही चर्चेत असतो. कसाबला तुरुंगात बिर्याणी दिली जात होती का, अशी चर्चा त्यावेळी देशभर रंगली होती. मात्र, हा दावा प्रत्यक्षात कसा जन्माला आला, याचा खुलासा राज्यसभा सदस्य व ज्येष्ठ विधिज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी केला. नागपूर येथे आयोजित एका पुरस्कार सोहोळ्यात त्यांनी सांगितले की, कसाबने बिर्याणी मागितल्याची बातमी ही प्रत्यक्षात त्यांनीच जाणीवपूर्वक पेरलेली होती. त्यामागचा उद्देश मात्र वेगळाच होता.
राखीच्या प्रसंगानंतर घडले काय?
निकम यांच्या म्हणाले, कसाबच्या खटल्यादरम्यान रक्षाबंधनाच्या दिवशी ते न्यायालयात राखी बांधून गेले होते. कसाबने त्यांच्या हातातील राखीबाबत विचारणा केली. त्यावर निकम यांनी त्याला भाऊ-बहिणीच्या नात्याची आणि संरक्षणाच्या वचनाची माहिती दिली. याचवेळी न्यायाधीश न्यायासनावर आले. झालेला संवाद त्यांना सांगितल्यानंतर कसाबने मान खाली घातली आणि डोळे पुसल्यासारखे केले. न्यायालयाबाहेर उपस्थित माध्यमांनी लगेचच ‘कसाबच्या डोळ्यांत पाणी’ अशी ब्रेकिंग न्यूज चालवण्यास सुरुवात केली.
‘सहानुभूतीची लाट’ रोखण्यासाठी बिर्याणीचा उल्लेख
निकम म्हणाले, कसाबबद्दल सहानुभूती निर्माण होण्याची शक्यता मला जाणवली. त्यामुळे मी माध्यमांसमोर जाऊन सांगितले की, आज कसाबने मटण बिर्याणीची मागणी केली. त्यानंतर लगेचच ती बातमी झळकू लागली. दुसऱ्या दिवशी न्यायालयात कसाबच्या वकिलांनी या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर निकम यांनी न्यायालयातच विनोदी शैलीत उत्तर दिले. तो पाकिस्तानातून आलेला आहे, रोज मांसाहार करत असेल. मग बिर्याणी मागितली नसेल का? त्यालाच विचारा, असे त्यांनी सांगितले.
कसाबने मान डोलावली आणि चर्चा रंगली
निकम यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयात काय चर्चा सुरू आहे हे कसाबला पूर्णपणे समजले नव्हते. त्याला बिर्याणी देण्याबाबत बोलणे सुरू असल्याचे वाटले आणि त्याने मान डोलावली. त्यामुळे ‘कसाबने बिर्याणी मागितली’ या चर्चेला आणखी खतपाणी मिळाले. खरंच कसाबने बिर्याणी मागितली होती की नाही, हे आज फक्त कसाबलाच माहीत असेल, असे मिश्किल भाष्यही निकम यांनी केले.
पुन्हा चर्चेत आलेला जुना वाद
२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. जिवंत पकडण्यात आलेल्या कसाबविरुद्धच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्यांच्या या खुलाशानंतर ‘कसाब आणि बिर्याणी’ हा अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला किस्सा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
