नागपूर : नक्षलसमर्थक असलेल्या केरळच्या युवकाला नागपुरातील एका हॉटेलमधून अटक केली. त्याच्यासोबत त्याची मैत्रिणसुद्धा हॉटेलमध्ये उपस्थित होती. रेजाझ माडेपड्डी शिबा सिदीक (वय २६, रा. एडापल्ली, केरळ) असे आरोपी युवकाचे नाव आहे. ही कारवाई लकडगंज पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेजाझ सिदीक हा स्वत:ला विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता आणि पत्रकार असल्याचे सांगतो. अलीकडेच तो दिल्लीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत सहभागी झाला होता. ही परिषद देशात अटक करण्यात आलेल्या पत्रकारांच्या सुटकेसाठी आयोजित करण्यात आली होती. त्याची ओळख प्रीया (२२, रा. पटना, बिहार) हिच्याशी इंस्टाग्रामवरुन झाली.
प्रीया ही पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेते. तिनेच लकडगंजमधील हॉटेल बुक केले होते. तेथे ती रेजाझ याच्यासोबत थांबली होती. रेजाझ याचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याची माहिती लकडगंज पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेचे कमलाकर गड्डीमे यांनी पथकासह हॉटेलमध्ये छापा घातला. हॉटेलमधून रेजाझ आणि प्रीयाला ताब्यात घेण्यात आले. रेजाझच्या बॅगेत नक्षलवाद्यांशी संबंधित काही पुस्तके पोलिसांना आढळून आली. या प्रकरणी दोघांनाही लकडगंज पोलीस ठाण्यात आणण्यात आले. रेजाझवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.
या कायद्यानुसार गुन्हा
लाकडगंज पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिदीक याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम
१४९ (सरकारविरुद्ध युद्ध छेडण्याची तयारी)
१९२ (दंगल घडवून आणण्याचा उद्देशाने उकसवणी देणे)
३५१ (गुन्हेगारी धमकी)
३५३ (सार्वजनिक शांततेस बाधा पोहोचवणारे विधान)
आणि अन्य काही कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.