खामगाव : कुणाचा मृत्यू कसा आणि कधी होईल हे कुणालाच सांगता येत नाही.याची भीषण प्रचिती आणणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात घडली.
पिंपळगाव राजात खळबळ
बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या भिंतीवर पाणी टाकत असताना अचानक भिंत अंगावर कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतामध्ये एका वृद्धाचा व तरुणाचा समावेश असून हे नात्याने जावई आणि सासरे आहेत. ही हृदयद्रावक व तितकीच धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा या नगरवजा गावात घडली. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत घटनेची नोंद केली आहे.
काय झाले नेमके?
मुकद्दर खान जमशद खान (वय ७४ वर्ष) आणि शेख युसुफ शेख बिस्मिल्ला (वय ३८ वर्ष) अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. येथे प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील रहिवासी असलेले हे दोघे काल गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास पिंपळगाव राजा येथे एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या भिंतीला पाणी देत होते. यादरम्यान अचानक ती भिंत खचली आणि थेट या दोघांच्या अंगावर कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने दोघेही गंभीर रित्या जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.चरखा यांनी त्यांची तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले.
कक्षसेवकाने केली तक्रार
या घटनेबाबत सामान्य रुग्णालयातील कक्षसेवक विलास शिवराम वडोदे (वय ४४ वर्ष) यांनी खामगाव शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावरून खामगाव शहर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे पिंपळगाव राजा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
