बुलढाणा : आजच्या स्वार्थी युगात माणसाला माणुसकीचा, नात्याचा तेही अगदी रक्ताच्या नात्याचाही  विसर पडला आहे. क्षुल्लक कारणावरून माणूस कुणाच्याही नरडीचा घोट घ्यायला तयार आहे. आता  तर रक्ताच्या नात्याचा देखील विसर पडल्याचे भीषण चित्र आहे.

खामगाव तालुक्यातील  राहूड गावात घडलेल्या भीषण घटनाक्रमाने याचा  प्रत्यय आला. किरकोळ कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने धाकट्या भावाची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळून टाकला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी राख पूर्णा नदीत विसर्जित केल्याची खळबळजनक घटना  राहुड गावात उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे आणि समाजमन सुन्न झाले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या सख्ख्या भावाची सुनियोजितपणे हत्या करणाऱ्या या नराधम भावास पिंपळगाव  राजा  पोलिसांनी अटक केली आहे. या क्रूर कृत्यात त्याला सहकार्य करणाऱ्या त्याच्या मित्राला देखील गजाआड करण्यात आले आहे.

 चेतन संजय इंगळे (वय ३५, राहणार राहूड, तालुका खामगाव )  असे  क्रूर हत्येचा बळी ठरलेल्या मृत लहान भावाचे नाव आहे.  रोशन संजय इंगळे (वय ३६, राहणार राहूड, तालुका खामगाव )  असे आरोपी मारेकरी मोठ्या भावाचे नाव आहे.  रोशन सह त्याचा सहकारी रवी राऊत (वय ३५, महाकाल चौक राहणार खामगाव, जिल्हा बुलढाणा ) यालाही अटक करण्यात आली आहे. 

असा झाला उलगडा

दोघा भावात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. आरोपी रोशनला दारूचे व्यसन होते. चेतन शेतीत व्यस्त होता आणि तो शांत स्वभावासाठी गावात ओळखला जात होता. दारूच्या नशेत रोशन अनेकदा मारामारीत सहभागी होत असे. शिवाय, चेतनच्या चारित्र्याबद्दलच्या संशयामुळे दोन्ही भावांमधील वाद आणखी वाढला होता.दरम्यान  चेतन अचानक गावात दिसेनासा झाल्याने

राहुड चे पोलीस पाटील विलास बनसोडे यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात चेतन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलीस ठाणे प्रभारी भागवत मुळीक यांनी तात्काळ एक विशेष पथक तयार करून शोध मोहीम सुरू केली.चेतनचा कोणताही मागमूस सापडला नाही, त्यामुळे त्याचा भाऊ रोशनची ‘कडक चौकशी’ करण्यात आली. असमाधानकारक उत्तरांमुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला.

अखेर, चौकशीदरम्यान रोशनने गुन्ह्याची कबुली दिली. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे १२ ते १ वाजेच्या दरम्यान गावाजवळील त्याच्या शेतात  चेतनच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर लहान भावाचा मृतदेह जाळून आणि येरळी जवळील पुलावरून पूर्णा नदीत जळालेले अवशेष विसर्जित करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तपासासाठी पोलिसांनी खामगावहून फॉरेन्सिक टीम’ आणि अकोलाहून श्वान पथकाला घटनास्थळी पाचरण करण्यात आले. जिथे मानवी अवशेष सापडले.

तपासादरम्यान, मुख्य आरोपी रोशन इंगळे आणि त्याचा सहकारी रवी राऊत (३५, महाकाल चौक रा. खामगाव) याला ही अटक करण्यात आली.घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा व उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी सुद्धा भेट दिली.आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता अंतर्गत खून आणि पुरावे नष्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या मते, आणखी काही आरोपींचा सहभाग नाकारता येत नाही. भागवत मुळीक यांनी सांगितले की,घटनेचा जलद तपास केल्यानंतर काही तासांतच आरोपींची ओळख पटली. सखोल चौकशी सुरू आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.