पनवेल – ऐन उष्णतेच्या काळात सलग दोन रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने खारघरमधील हजारो नागरिकांना अंधार, उकाडा आणि डासांच्या त्रासाचा सामना करावा लागला. अचानक बिघडलेल्या वीज वितरण व्यवस्थेमुळे उपनगरातील अनेक भागांमध्ये वीज गायब झाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
रविवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास गेलेली वीज सोमवारी पहाटेपर्यंत सुरळीत झाली नाही. त्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा सेक्टर १९ व २० परिसरात वीजपुरवठा खंडित झाला आणि मध्यरात्री उशिरा तो पूर्ववत करण्यात आला. महावितरणच्या वीज व्यवस्थेत अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे रविवारी मध्यरात्री तळोजा औद्योगिक वसाहतीतही अशाच प्रकारचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
खारघर उपनगरात सुमारे ९० हजार वीज ग्राहक आहेत. रविवारी झालेल्या बिघाडामुळे जवळपास २० हजार ग्राहकांना अंधार आणि उकाड्याचा सामना करावा लागला. तर सोमवारी रात्री पुन्हा सुमारे ३ हजार ग्राहक वीज समस्येमुळे त्रस्त झाले. सध्या शैक्षणिक संस्थांमध्ये परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यास आणि झोप यावरही परिणाम झाला आहे.
खारघरच्या माजी नगरसेविका नेत्रा पाटील यांनी महावितरणकडे तक्रार करून उन्हाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, महावितरणच्या खारघर विभागाचे उपकार्यकारी अभियंत्यांनी सांगितले की, सोमवारी उपकेंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानंतर तातडीने तंत्रज्ञ आणि कामगारांच्या मदतीने दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. तसेच ४० केव्ही पुरवठा लाईनमध्ये अडचण निर्माण झाल्याने पर्यायी व्यवस्था उभी करून दोन तासांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला
मागील वर्षी जून महिन्यात २० तास खारघरवासीयांना अंधारात राहावे लागले. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी स्मार्ट व आधुनिक शहर अंधारात राहील्याच्या बातम्यांना ठळक प्रसिद्धी दिल्यानंतर येथील विज व्यवस्था सूधारेल अशी चर्चा होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे खारघरचे महत्व वाढले आहे. याच शहरात बीकेसीसारख्या वाणिज्यिक कार्यालयांची उभारणी केली जात आहे. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा कांगावा करणा-या सरकारी प्रशासनाकडून या शहराच्या वीज व्यवस्था बळकटीकरणाची अंमलबजावणी करावी लागणार आहे.
