अकोला : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर खतांचा वापर होताे. शेतकऱ्यांकडून डीएपी खताची प्रचंड मागणी होत असते. मात्र, राज्यात मागणीनुसार अपेक्षित पुरवठा होत नसल्याने डीएपी खताचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढू शकतात. या पार्श्वभूमीवर डीएपीऐवजी पर्यायी खत वापरण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे नाहीच

राज्यामध्ये मागील तीन वर्षांत खरीप हंगामात ४४ लाख मे.टन रासायनिक खतांचा वापर झाला. त्यामध्ये प्रामुख्याने युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते व एसएसपी खतांचा वापर केला जातो. मृद परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापरली जाते. खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात होणार असून डीएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी होणार आहे. डीएपी खतामध्ये १८ टक्के नत्र तर ४६ टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. राज्यामध्ये डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नाही.

डीएपी खतानंतर एसएसपी खताची सर्वाधिक मागणी

स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी खताची सर्वाधिक मागणी होते. एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद १६ टक्क्यांसह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामूळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डिएपीस चांगला पर्याय आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. एसएसपी बरोबरच संयुक्त खते वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होते. या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो.

डीएपी खतावरच अवलंबून न राहता पर्यायाचा शोध आवश्यक

टिएसपी खतामध्ये ४६ टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टिएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो डीएपीला पर्याय ठरू शकतो. डीएपी खताचा तुटवडा लक्षात घेता ऐन हंगामात शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.