अकोला : चालू खरीप हंगामातील पेरणीच्या मदतीसाठी ‘अवकाळी’चा निधी आला आहे. राज्यात एप्रिल व मे महिन्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यावर राज्य शासनाने ४५ हजारावर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ८४.२३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. यामध्ये पश्चिम विदर्भात ६८.०९ कोटींचा निधी वितरीत केला जाणार आहे. ऐन खरीप हंगामात मदत मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

हंगामामध्ये उपयोगी पडण्यासाठी मदत

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत देण्यात येते. एप्रिल व मे महिन्यात राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भाजीपाला, फळबागा उद्ध्वस्त झाल्या. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली.

निधी मागणीच्या प्रस्तावाला मंजुरी

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंचनामे करून विभागीय आयुक्त नागपूर, नाशिक, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व पुणे यांनी शेतीपिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला. मदत देण्यासाठी शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार ८४ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली.

राज्यात विभागनिहाय असा मिळाला निधी

अवकाळी पावसामुळे राज्याच्या सहा विभागातील ४५ हजार ०४२ शेतकऱ्यांच्या ३८ हजार ३५८.७० हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी मदत निधी मंजुरीचा शासन निर्णय १० जुलैला निर्गमित करण्यात आला. यामध्ये ३० हजार ३२५.१० हेक्टरवर नुकसान झालेल्या अमरावती विभागातील २८ हजार ७५१ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक ६८ कोटी ०९ लाख ५५ हजारांचा निधी दिला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील २७२ शेतकऱ्यांसाठी ४० लाख ९२ हजारांच्या निधीचा समावेश करण्यात आला. नागपूर विभागात तीन हजार ४५० हेक्टरवर नुकसान झाले होते. विभागाच्या तीन जिल्ह्यातील सात हजार ४१३ शेतकऱ्यांसाठी सहा कोटी सात लाख ६५ हजार रुपये मंजूर केले. नाशिक विभागातील चार हजार ३९९ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाच कोटी २४ लाख, कोकण विभागातील ६२६ शेतकऱ्यांसाठी ३२ लाख १४ हजार, छत्रपती संभाजीनगर विभागातील ५९४ शेतकऱ्यांसाठी ७६ लाख ९९ हजार, तर पुणे विभागातील तीन हजार २५९ शेतकऱ्यांसाठी तीन कोटी ७३ लाख २० हजार रुपये मंजूर झाले आहेत.