अमरावती : जिल्ह्यात अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला असून पुराचे पाणी गावांमध्ये शिरले आहे. तिवसा तालुक्यातील पिंगळाई नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावे बाधित झाली, तर पुरामुळे खरवाडी नाल्यात वाहून जाणाऱ्या एका दहा वर्षीय बालकाचे तसेच दोन दुचाकीस्वारांचे प्राण वाचवण्यात जिल्हा शोध व बचाव पथकाला यश आले.

खरवाडी नाल्याला पूर आल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला मिळताच बचाव पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आणि काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. दरम्यान, खरवाडीतील बोधी गजानन मनोहरे (१०) पाय घसरून पुराच्या पाण्यामध्ये वाहत जात असल्याचे कर्मचाऱ्यांना लक्षात आले. लगेच पथकातील सदस्यांनी पुराच्या पाण्यामध्ये उडी घेऊन त्याला सुखरूप बाहेर काढले. याशिवाय बंडू खैरकार (५०) आणि दिलीप डाखोरे (५२) हे दोघे खराळा येथून अमरावतीकडे येत असताना त्यांची दुचाकी घसरून ते नाल्याच्या पुरात वाहून जात होते. बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी व दोराच्या साह्याने दुचाकी व दोन्ही व्यक्तींना पुराच्या पाण्याबाहेर सुखरूप काढले.

पथक प्रमुख दीपक डोळस, उदय मोरे, गजानन वाडेकर, सूरज लोणारे, राजेंद्र शहाकार, अजय असोले, दीपक चिल्लोलकर, महेश मांडाळे, भरत सिंग चव्हाण यांनी मदत कार्यात सहभाग घेतला.