लोकसत्ता टीम

अकोला : शहरातील रायलीजीन भागातून एका व्यावसायिकाचे शस्त्राच्या धाकावर चारचाकीमध्ये डांबून तीन ते चार अज्ञात आरोपींनी अपहरण केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. या सिनेस्टाईल घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अरुण वोरा असे अपहरण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

शहरातील दगडीपूल परिसरात वोरा यांचे रिकाम्या काच बॉटलचे गोदाम आहे. रात्री काम आटोपून ते घरी जाण्यासाठी निघाले असता तीन ते चार जणांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांना चारचाकी गाडीत डांबले. पांढऱ्या रंगाच्या गाडीतून भरधाव वेगात पसार झाले. अपहरणकर्ते सुमारे एक ते दीड तासापासून त्यांच्या मागवर होते, अशी माहिती आहे. स्थानिक नागरिकांनी अपहरण झाल्याची माहिती दिल्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर धाव घेतली.

आणखी वाचा-चंद्रपूर : उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव, काय आहे प्रकरण जाणून घ्या…

व्यावसायिक वोरा यांची व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल सुरू राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी रात्री उशिरा रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली असता त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरेच उपलब्ध नसल्याचे आढळून आले. घटनास्थळावर व्यावसायिक अरुण वोरा यांचा भ्रमणध्वनी पडलेला आढळून आला. पोलीस कसून तपास करीत असून शोध घेण्यासाठी पथके विविध भागात रवाना करण्यात आली आहेत. व्यावसायिकाचे अपहरण झाल्याने शहरात खळबळ उडाली असून व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.