चंद्रपूर : मूत्रपिंड विक्री प्रकरणात बंगळुरू येथील आणखी एका पीडिताची ओळख पटली आहे. हा व्यक्ती या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलिसांना पाहून तो पसार झाला होता. त्याला चंद्रपूर पोलीस मुख्यालयात तत्काळ हजर रहावे, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.

पोलिसांचे एक पथक पीडिताला ताब्यात घेण्यासाठी बंगळुरू येथे गेले होते. मात्र, पोलीस अटक करणार, या भीतीने तो पळाला. येत्या दोन ते तीन दिवसात हा व्यक्ती पोलिसांसमोर स्वत:हून हजर होणार असल्याची माहिती आहे. या व्यक्तीचे मूत्रपिंडदेखील त्रिची येथील क्रिम्स रुग्णालयात काढण्यात आले होते.

याप्रकरणी उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतलेल्या पीडिताचा व्यवसाय होता. वडिलांना व्यवसायात अपयश आल्याने त्याने अवघ्या पाच लाखात मूत्रपिंड विकल्याचे सांगितले जात आहे. त्याला चंद्रपूर पोलिसांनी गुप्त ठिकाणी ठेवले आहे. तसेच रोशन कुडेसोबत कोलकाता येथे गेलेल्या पथकाला हॉटेलची माहिती, नाव तसेच रक्तगट तपासणी केलेल्या प्रयोगशाळेचे नाव, कागदपत्रे मिळाली आहेत. या प्रकरणात आणखी काही डॉक्टर सहभागी असल्याचे बोलले जात आहे.

डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्या जामिनावर आज सुनावणी

जिल्हा व सत्र न्यायालयात दिल्ली येथील डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्या जामीनावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. डॉ. सिंग बाहेर देशात पळून जाऊ नये, यासाठी पोलीस पथकाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.