नागपूर : प्रथम करोना, त्यानंतर मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्राची मुदत संपणे आणि रुग्णालयातील ‘नेफ्रोलाॅजिस्ट’च्या सेवानिवृत्तीमुळे नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्नित सुपरस्पेशालिटी या एकमात्र मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्रातील प्रत्यारोपण थांबले होते. परंतु, आता पुन्हा या केंद्राला मंजुरी मिळाली व येथे नवीन ‘नेफ्रोलाॅजिस्ट’ रूजू झाल्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण सुरू होणार आहे.
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सुपरस्पेशालिटीतील मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेतील रुग्णांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पुढाकारानेच येथे कंत्राटी सहयोगी प्राध्यापक म्हणून ‘नेफ्रोलाॅजिस्ट’ डॉ. पीयूष किंमतकर रूजू झाले. या प्रक्रियेनंतर येथे दोन मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेतील रुग्णांची चाचपणीही झाली. या रुग्णांच्या नातेवाईकांकडून मूत्रपिंड दान देण्याची तयारी दर्शवण्यासह बऱ्याच तपासण्याही करण्यात आल्या. शेवटी मूत्रपिंड प्रत्यारोपणापूर्वी नातेवाईकांची फेरतपासणीची बैठकसह इतर प्रक्रिया झाल्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शक्य होईल.
दरम्यान, सुपरस्पेशालिटी रुग्णालयात २०१६ मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र सुरू झाले. हे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील पहिले केंद्र होते. या केंद्रातच त्यावेळच्या राजीव गांधी जीननदायी आरोग्य योजनेतून पहिली मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून येथे प्रत्येक वर्षी हे प्रत्यारोपण २०१९ वर्षांपर्यंत वाढत होते. परंतु, करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर प्रत्यारोपणावर मर्यादा आल्या. त्यातच करोनामुळे या प्रत्यारोपण केंद्राची प्रत्येक पाच वर्षांनी घ्यायची मंजुरी खोळंबली. या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू झाले. मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्राने मंजुरी मिळाल्यावर येथील नेफ्रोलाॅजिस्ट डॉ. चारुलता बावनकुळे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यामुळे ‘नेफ्रोलाॅजिस्ट’ नसल्याने येथील मूत्रपिंड प्रत्यारोपण थांबले. परंतु आता केंद्राला मंजुरी व ‘नेफ्रोलाॅजिस्ट’ मिळाल्याने पुन्हा केंद्र सुरू होणार आहे.
सुपरस्पेशालिटी रुग्णालयात ‘नेफ्रोलाॅजिस्ट’ रूजू झाला आहे. वरिष्ठ निवारी डॉक्टरही येथे दिले गेले. त्यामुळे येथे तूर्तास डायलेसिसची संख्या वाढली. तर दुसरीकडे सर्व सोय झाल्याने आता लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण होईल. त्यासाठी काही रुग्णांची चाचपणीही झाली आहे.
– डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल रुग्णालय, नागपूर.
वर्ष प्रत्यारोपण
२०१६ ०९
२०१७ १७
२०१८ १३
२०१९ २१
२०२० ०६
२०२१ ००