नागपूर : आई-वडिलांना काम असल्यास लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊन त्यांना शांत करण्याची पद्धत सर्वत्र दिसून येते. मात्र, लहान वयात वाढत्या स्क्रीन वापराचा मुलांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होत असल्याचे चिंताजनक निरीक्षण पुढे आले आहे. शहरात दीड वर्षांच्या वयोगटातील शंभर मुलांपैकी सुमारे १५ मुलांमध्ये ऑटिझमसदृश लक्षणे आढळत असल्याचे नागपूरमधील ‘लिटल ब्रेन सेंटर’च्या तज्ज्ञांनी नोंदवले आहे. त्यामुळे पालकांनी स्क्रीन टाईमबाबत सजग राहण्याची गरज आहे.
नागपुरात मोठ्या प्रमाणावर बालरोग तज्ज्ञ आहे. त्यामुळे या डाॅक्टरांकडे विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील अनेक रुग्ण उपचारासाठी येथे येतात. पालकांच्या सूचना न पाळणाऱ्या मुलांपैकी १५ टक्के मुले स्क्रीनचा अतिवापर करीत असल्याचे बालरोग तज्ज्ञ सांगतात. लिटल ब्रेन सेंटरच्या निरीक्षणानुसार, मोबाईल, दूरदर्शन किंवा इतर डिजीटल पडद्यावरील माध्यमांचा अतिरेकी वापर करणाऱ्या मुलांमध्ये बोलण्यात उशीर, डोळ्यांत डोळे न मिळवणे, नावाला प्रतिसाद न देणे तसेच सामाजिक संवादात कमतरता अशी लक्षणे प्रकर्षाने दिसून येतात. ही लक्षणे ऑटिझमसदृश असली तरी सर्वच प्रकरणांमध्ये ती कायमस्वरूपी विकाराचे निदर्शक नसतात.
लहान वयात प्रत्यक्ष मानवी संवाद कमी होऊन स्कीनसोबत एकतर्फी संपर्क वाढल्याने मेंदूच्या सामाजिक व भाषिक विकासावर परिणाम होतो. त्यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासावर परिणाम जाणवतो. वेळेत स्क्रीनचा वापर कमी करून पालकांनी मुलांशी संवाद वाढवला आणि आवश्यकतेनुसार उपचार घेतले, तर ही लक्षणे कमी होऊ शकतात. मात्र, असे झाले नाही तर ऑटिझमची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे लिटल ब्रेन सेंटरचे संचालक व बालमेंदूरोग तज्ज्ञ डॉ. अमरजीत वाघ यांनी सांगितले.
ऑटिझम दिनानिमित्त चिमुकल्यांची सहल
ऑटिझम जनजागृती दिनानिमित्त लिटल ब्रेन सेंटर आणि दिव्ययोगी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रमन विज्ञान केंद्र येथे ३ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात मुलांना चंद्र, सूर्य, तारे तसेच विज्ञानाशी संबंधित विविध माहिती देण्यात येणार आहे.
बालमेंदूरोग तज्ज्ञ काय म्हणतात…
“बालविकासाच्या दृष्टीने पहिल्या दोन वर्षांत स्क्रीनचा वापर अत्यंत मर्यादित असावा. पालकांनी मोबाईल किंवा टीव्ही पुढे बसवण्याऐवजी त्यांच्याशी संवाद आणि प्रत्यक्ष सहभाग यावर भर दिल्यास मेंदूच्या विकासाला चालना मिळते. मात्र दुर्लक्षामुळे स्क्रीन टाईम वाढून सुमारे १५ टक्के मुलांमध्ये ऑटिझमसदृश लक्षणे दिसतात. वेळेत तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास बहुतांश मुलांमध्ये सुधारणा होते.” – डॉ. अमरजीत वाघ, बालमेंदूरोग तज्ज्ञ, लिटल ब्रेन सेंटर, नागपूर</p>
