अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालाने या मतदारसंघावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित केले आहे. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांनी विजय मिळवला. आजवर या मतदारसंघात शिक्षक संघटनांचे प्रभूत्व होते. गेल्या निवडणुकीत किरण सरनाईक हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आणि राजकीय वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.
बंडखोरीने गाजलेली निवडणूक
अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत जुन्या पेन्शनचा प्रलंबित लढा, अपुरा निधी आणि अशैक्षणिक कामांचा वाढता ताण यांसह अनेक मुद्दे प्रचारादरम्यान उपस्थित झाले होते. पण, ही निवडणूक बंडखोरीने गाजली. किरण सरनाईक यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर श्रीकांत देशपांडे यांच्यासह भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे आणि चंद्रशेखर भोयर यांनी लढत दिली. देशपांडे वगळता संगीता शिंदे आणि भोयर हे दोन्ही उमेदवार मागे पडले.
काँग्रेसची झुंज अपयशी
दुसरीकडे, काँग्रेस पक्ष देखील या निवडणुकीत ताकदीने मैदानात उतरला होता. काँग्रेसने श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या अदिती पोहरे यांना उमेदवारी दिली होती. ऐनवेळी उमेदवारी मिळूनही त्यांनी चांगली लढत दिली. मात्र, काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात मैत्रिपूर्ण लढत झाली. ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने यांनी आधीपासून तयारी केली होती. पण, त्यांनाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
वाढलेले ‘अर्थकारण’ चर्चेत
पुर्वी शिक्षक संघटनांची म्हणून ओळखली जाणारी ही निवडणूक राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली होती. गेल्या चार दशकांमध्ये १८ वर्षे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रतिनिधींनी तर १२ वर्षे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गेल्या बारा वर्षांमध्ये अपक्षांनी या मतदारसंघाची धुरा सांभाळली. यावेळी प्रथमच राजकीय पक्षाचा झेंडा फडकला आहे. गेल्या दोन निवडणुकांपासून वाढलेले ‘अर्थकारण’ चर्चेत आले आहे. यात शिक्षण क्षेत्रातील सामान्य, प्रामाणिक शिक्षक उमेदवार आर्थिक ताकदीअभावी मागे पडतो, अशी चर्चा रंगली. निवडणूक ‘पैसा, पार्ट्या आणि भेटवस्तू’ यांच्या भोवती फिरल्याचे बोलेले गेले.
बंडखोरी झाली नसती, तर…
भाजपमध्ये बंडखोरी झाली नसती, तर मी पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीतच कोटा पूर्ण करून निवडून आलो असतो, असे किरण सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, पण बंडखोर उमेदवारांनी पक्षनेतृत्वाचे ऐकले असते, तर माझ्यासाठी ही निवडणूक सोपी गेली असती, असे सरनाईक म्हणाले.
