अमरावती: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यात महापालिकेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली होती. या बैठकीस महापालिका आयुक्त, महापौर तसेच भाजपचे सभागृह नेते उपस्थित होते. तसेच, या बैठकीत पोलिस विभागाचे प्रतिनिधी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते. ही बैठक जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रांच्या अनियमितता/बनावट प्रकरणांच्या संदर्भात आयोजित करण्यात आली होती. अशा प्रकारची बैठक घेता येते का, असा प्रश्न उपस्थित झाला. या बैठकीवरून उफाळून आलेला वाद अजूनही शमलेला नाही. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी या प्रकरणावरून महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
नेमके प्रकरण काय?
गेल्या २० फेब्रुवारीला किरीट सोमय्या यांनी महापालिकेत बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला महापालिका आयुक्तांसह महापौर, तसेच भाजपचे सभागृह नेते उपस्थित होते. ही बैठक जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रांच्या अनियमितता/बनावट प्रकरणांच्या संदर्भात आयोजित करण्यात आली होती. महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून, तिच्या प्रशासकीय कार्यप्रणालीत किंवा बैठकीच्या प्रक्रियेत माजी खासदार (जे सध्या कोणत्याही अधिकृत पदावर नाहीत) यांना अध्यक्षस्थानी बसवून बैठक घेण्याची तरतूद किंवा अधिकार आहे का ? महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ संबंधित कायद्यांतर्गत अशा प्रकारच्या बैठकीसाठी कोणत्या अधिकृत व्यक्तीला अध्यक्षता करण्याचा अधिकार आहे, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला होता. त्यानंतर ही बैठक आपल्या पत्रावर आयोजित करण्यात आली होती, असे स्पष्टीकरण महापौर श्रीचंद तेजवानी यांनी दिले होते. त्यानंतरही हा वाद मिटू शकला नाही.
विश्वंभर चौधरी यांचा आरोप काय?
विश्वंभर चौधरी यांनी या प्रकरणात माहिती कायद्यांतर्गत माहिती मागवली होती. त्यांना जे उत्तर मिळाले, त्यावरून चौधरी यांनी महापालिका प्रशासन आणि सरकारवर टीका केली आहे. विश्वंभर चौधरी म्हणतात, खोटारडेपणाची हद्द आहे! किरीट सोमय्यांनी अमरावती महापालिकेत अनधिकृत बैठक घेतली होती. या बैठकीला स्वतः आयुक्त उपस्थित होत्या. महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर त्याचे फोटो पाहून मी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवली होती. त्यावर महापालिका म्हणते की, अशी बैठक आयोजित केलीच नव्हती. मग बैठकीचा फोटो कसा टाकला त्यात भूते बसली होती का? अतिशय संताप आणणारा हा खोटारडेपणा आहे. सरकारची नियत किती बेक्कार आहे हेच यातून दिसते.
