नागपूर : बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांना फसव्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यभरातील महापालिकांना धारेवर धरले. त्यानंतर जन्म प्रमाणपत्र देण्याबाबत महापालिकेचे अधिकार काढण्यात आले. परिणामी केवळ तीन तासांची प्रक्रिया आता तीन महिन्यांवर गेल्याने ऐन महाविद्यालय व शाळा प्रवेशाच्या काळात आवश्यक जन्मप्रमाण मिळत नसल्याने मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यभरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर महापालिकांचे जन्म, मृत्यू प्रमाणपत्राचे अधिकार जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांकडे देण्यात आले. राज्य शासनाच्या नव्या निर्देशानुसार जन्म, मृत्यू नोंदीसाठी नवीन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली. या संगणक प्रणालीत २०१६ पासून आतापर्यंत जन्म, मृत्यू केल्या जात असून त्यापूर्वीच्या नोंदीही याच २०१६ च्या संगणक प्रणालीत घेण्यात येत आहे. या नोंदी घेतल्यानंतर त्या जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येत असल्याचे महापालिकेतील जन्म मृत्यू विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्या मंजुरीनंतरच जन्म, मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. संगणक प्रणालीही संथ असल्याने महापालिकेत दररोज नागरिकांची गर्दी होत असून विद्यार्थ्यांच्या संतापाचे बळी महापालिकेचे अधिकारी ठरत आहे. आधी ही प्रक्रिया तत्काळमध्ये तासाभरात १०० रुपयांच्या शुल्कासह तर तीन किंवा चार दिवसांत २० रुपये शुल्क घेऊन केली जात होती, असे अधिकाऱ्यांनी नमुद केले.
एकच लॉगीन आणि संथ प्रणालीमुळे दररोज ८० अर्ज प्रलंबित
महापालिकेत जन्म, मृत्यू नोंदीसाठी शंभरावर अर्ज येत आहे. परंतु नोंद करण्यासाठी केवळ एकच लॉगीन असून ते एकाच संगणकासाठी आहे. यापूर्वी एकाचवेळी २० संगणकांवर लॉगीन करता येत होते. आता एकाच संगणकावर लॉगीन होत असून सॉफ्टवेअरही संथ आहे. त्यामुळे दिवसांत केवळ २० ते २५ अर्जांची नोंद केली जात आहे. परिणामी दररोज ७५ ते ८० अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांच्या प्रलंबित अर्जांची संख्या वाढत असून विद्यार्थ्यांना वेळेत जन्म प्रमाणपत्र मिळण्यात अडथळा निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांवरही ताण
महापालिकेकडून दररोज २० अर्ज जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत आहे. जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहे. एकीकडे संथ संगणक प्रणाली व दुसरीकडे अर्जांचा डोंगर असून महापालिकेचे पूर्ण अर्ज मंजूर होत नाही. परिणामी तिथेही अर्ज प्रलंबित राहात असल्याने विद्यार्थी, नागरिकांना वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याचे अधिकाऱ्याने नमुद केेले.
पंधरा वर्षानंतर नाव नोंदणीचा पर्यायही नाही
२७ एप्रिल २०२६ पासून ५० वर्षांपर्यंत जन्म नाव नोंदीची तरतूद रद्द करून ते १५ वर्षांपर्यंत करण्यात आली. अनेकदा खाजगी नोकरीनिमित्त सतत बाहेर असलेले कुटुंबाला नागपुरात नोंदणीसाठी सवड मिळत नाही. परंतु मुलगा दहावी झाल्यानंतर नाव नोंदीची गरज पडते. तोपर्यंत मुलगा १६ वर्षांचा होतो. त्यानंतरच खऱ्या अर्थाने जन्म प्रमाणपत्राची गरज भासते. परंतु १५ वर्षानंतर नाव नोंदणी न केल्यास त्या मुलासाठी दुसरा पर्यायच शासनाने ठेवला नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
नाव दुरुस्तीबाबत शासनाचे ‘नरो वा कुंजरो वा’
एवढेच नव्हे जन्म दिल्यानंतर आईच्या किंवा वडिलांच्या नावाची चुकीची नोंद झाली असेल तर त्यात दुरुस्ती करू नये कि करावी, असेही कुठेही शासनाने स्पष्ट केले नाही. त्यामुळे जन्म प्रमाणपत्र देताना अडचण निर्माण करताना अधिकाऱ्यांची मोठी अडचण झाली असून संबंधित विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मृत्यू प्रमाणपत्राबाबतही हाच प्रकार आहे. अनेकदा घाटावर नातेवाईक मृतकाच्या घरगुती नावाची नोंद करतात. नंतर त्यात दुरुस्तीबाबत स्पष्टता नाही, असे अधिकाऱ्याने नमुद केले.
विद्यार्थीच नव्हे उदयोन्मुख खेळाडूंनाही फटका
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी आता क्यूआर कोड असलेले जन्म प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. नुकताच विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या १५ वर्षांखालील गटाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी विद्यार्थिनींची निवड झाली होती. त्यांनी क्यूआर कोड असलेल्या जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले असता त्यांना एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु निकड लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र दिल्याचे विशाल कोरके यांनी सांगितले. परंतु अजूनही अनेक खेळाडूंना प्रमाणपत्र मिळत नसल्याचे त्यांनी नमुद केले.
महापालिकेचे जन्म, मृत्यू प्रमाणपत्राचे अधिकार नाही. महापालिककडे आलेल्या अर्जावर आता जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावे लागते. याशिवाय आता एकच लॉगिन देण्यात आले असून सर्व्हरही संथ आहे. परिणामी अर्जाच्या नोंदीसही विलंब होत आहे. – डॉ. अतिकुर रहेमान खान, उप निबंधक, जन्म-मृत्यू विभाग, नागपूर महापालिका.
