अकोला : हिरव्या रंगामुळे दिल्लीमध्ये स्फोट होऊ शकला. ठिकठिकाणी स्फोट करण्याचा त्यांचा कट होता. हे लोक सातत्याने असे कृत्य करीत असतात, असा खळबळजनक आरोप भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज येथे केला. आतापर्यंत एक ठाकरे गोल टोपी लावत होते, आता दुसरे ठाकरे देखील त्यास्पर्धेत उतरले. त्यांनीही गोल टोपी लावण्यास सुरुवात केली आहे, असा टोला किरीट सोमय्यांनी राज ठाकरेंना लगावला.
बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांविरोधात किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अकोला जिल्ह्यात तब्बल १५ हजार ८४५ बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात प्रशासनाकडून आढावा घेण्यासाठी ते अकोल्यात आले असतांना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, माजी महापौर विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, ‘बिहार निवडणुकीतील निकालामुळे गोल टोपी लावून फिरणाऱ्यांना काही तरी अक्कल येणार आहे. महाराष्ट्रामध्ये जे झाले त्यापेक्षा दोन पाऊस पुढे बिहारमध्ये घडले. बिहारची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली. आम्ही बांगलादेशींविरोधात लढा पुकारल्यावर काँग्रेस, ठाकरे शिवसेनेचे आमदार, खासदार हिरवे झेंडे घेऊन येतात. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्धार आहे. आणखी १० लोक अर्धी टोपी घालून महाविकास आघाडीत गेले तरी राज्यात एकाही बांगलादेशींना राहू देणार नाही.’
‘ठाकरे, गांधी व पवारांमध्ये मुस्लिमांची लांगुलचालनाची स्पर्धा’
काँग्रेस बांगलादेशींसाठी लढले. गंभीर बाब समोर आली की, इथले मुस्लीम आक्रमक दहशतवादी झाले आहेत. त्यांच्या विरोधात कडक कारवाई होणार आहे. उद्धव ठाकरे, राहुल गांधी व शरद पवारांमध्ये मुस्लिमांची लांगुलचालन करण्याची स्पर्धा लागली आहे. बांगलादेशींना मतदार बनवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. मालेगावमध्ये तीन हजार २७६ बांगलादेशींचे नावे मतदार यादीतून काढण्यासाठी आम्ही यादी दिली.
सगळ्या बांगलादेशींची नावे मतदार यादीतून गायब होतील, असे किरीट सोमय्या म्हणाले. पराभवाला कोणी मतचोरी म्हणत असेल तर हे हास्यास्पद आहे. त्यांची मतीच गेली. गोल टोपी लावून बांगलादेशी ‘मियांभाईं’च्या भागे नवीन हिंदू ‘मियांभाई’ उभे झाले, त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील हीच अवस्था होणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
