नागपूर: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकार महाराज हे सतत चर्चेत असताताच. काही महिन्यांपूर्वी ते त्यांच्या मुलीच्या शाही साखरपुड्यामुळे चर्चेत होते. कार्यक्रमाचा थाट, त्यासाठीचा खर्च यामुळे वादात सापडले होते. यावरून इंदुरीकर महाराजांवर बरीच टीका झाली. त्यांनीही टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावर बरेच वाद, आरोप वगैरेही झाले. हेच इंदुरीकार महाराज आता पुन्हा चर्चेत आले आहेत, ते त्यांच्या नव्या विधानामुळे. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी केलेली काही वक्तव्य सध्या गाजत आहेत. यावेळी त्यांनी तरुणांना मोलाचा सल्ला दिला. पोरांनो दंगलीच्या भानगडीत पडू नका, गरीबांचे पोर आत गेले, मोठ्यांचे बाहेर… तुमचा वापर फक्त ‘युज अँड थ्रो’ म्हणून असे म्हणत त्यांनी तरूण मुलांना तळमळीचे आवाहन केले. मात्र, याचवेळी ३१ वर्षे शिव्या खाण्यात गेली, असे सांगत त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाबाबतही महत्त्वाचे विधान केले आहे.
मोबाईल’वर बंदी घाला
यावेळी त्यांनी परीक्षांच्या काळात मोबाईल बंदीचीही मागणी केली. बोर्डाच्या परीक्षा तोंडावर आहेत. मात्र, मुले मोबाईलमुळे अभ्यासच करत नाही. मग परीक्षावेळी खिडकीतून चिट्ठी घ्यायच्या आणि शिक्षकांना दम द्यायचा, आजच्या ४० टक्के मुलांची अशी परिस्थिती आहे असे इंदुरीकर म्हणाले. राज्यातील सर्व शाळांमध्ये नियमावली आणली पाहिजे. आणि परीक्षा काळात ‘मोबाईल’वर बंदी घातली पाहिजे’, अशी मागणी देखील इंदुरीकर महाराजांनी केली आहे.
३१ वर्षे शिव्या खाण्यात गेली
मी काहीही केले तरी लोक शिव्या देतात, मी फक्त सत्य बोलतो. लोक टीका करतात. ३१ वर्ष आयुष्य लोकांच्या शिव्या खाण्यात गेले, मग थोड्यासाठी कशाला बंद करायचे असे म्हणत यापुढेही आपण कीर्तन सुरू ठेवणार असल्याचे इंदुरीकर महाराज यांनी स्पष्ट केले. पण खरं बोलतोय म्हणून लोक आपल्या बोकांडी बसतात. आज हायवेच्या बाजूने ज्यांना जमिनी विकल्या, त्यांनी हॉटेल टाकले, आणि जमिनी विकणारे त्याच हॉटेलात मजूर झालेत. तर दुसरीकडे पाहले तर निम्मे ग्रामपंचायत सदस्य अंगठे बहाद्दर आहेत, असही इंदुरीकर म्हणालेत. तरुणांनी मोर्चे आणि दंगलीच्या भानगडीत पडू नये. पेनमध्ये कॅमेरे आहेत. टपरी पेटवाताना किंवा दंगलीत तुम्ही कुठे दिसले तर, १० वर्षांची शिक्षा होते. आतापर्यंत दंगलीमध्ये गरिबांची पोरं आत गेली आहेत, मोठ्या श्रीमंतांची पोरं नाहीत आणि ते कधी जाऊ देणारही नाहीत. तुमचा वापर फक्त ‘यूज आणि थ्रो’साठी होतो, असे इंदुरीकर महाराज यांनी सांगितले.

