अकोले: आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे लाल बावट्याच्या ‘लॉंगमार्च’ची यशस्वी सांगता झाली. चळवळींना ओहटी लागलेली असतानाच्या काळात या ‘लाँगमार्च’ने मिळविलेले यश निश्चितच वेगळे ठरते. सनदशीर मार्गाने पण ताकतीने रस्त्यावर उतरलेली जनता आणि जनतेच्या प्रश्नांकडे सहनभूतीने पाहणारे प्रशासन, शासन असेल तर जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात हे यातून दिसून आले.

‘सनदशिर मार्गाने कायदा न तोडता हजारोंच्या संख्येने ज्यावेळेस लोक रस्त्यावर उतरतात आणि चिकाटीने लढा देतात, कोणत्याही प्रकारचा आतीतायीपणा न करता आंदोलन केले, अभ्यासपूर्वक मागण्या मांडल्या तर लोकशाहीमध्ये अजूनही या मार्गाने यश मिळते हे  दाखऊन देणारा हा ‘लाँगमार्च होता’, ही डॉ. अजित नवले यांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. आदिवासी, शेतकरी, कामगार, मानधनावरील कर्मचारी यांच्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

किसान सभा व सीटु कामगार संघटनेने शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यासाठी राजूर (ता. अकोले) येथून २४ फेब्रुवारीला या ‘लाँगमार्च’ला सुरवात झाली. लाँग मार्चमध्ये आदिवासी शेतकरी, कामगार, कष्टकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तीन दिवस ५८ किमी.चा पायी प्रवास करून हे लाल वादळ अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री  राधाकृष्ण विखे यांच्या मतदार संघातील निझर्नेश्वर येथे पोहचले. प्रश्न न सुटल्यास विखे यांच्या लोणी येथील वाड्यापुढे ठिय्या देण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता.

कारण कोणतेही असो पण विखे यांची भूमिका मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे दिसत होते. त्यांनी पुढाकार घेऊन आंदोलक व विविध विभागांचे मंत्री यांच्यात संवाद घडवून आणला. त्या बैठकीत आंदोलकांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र शालेय शिक्षण व कामगार विभागाशी संबंधित मागण्या मान्य होत नसल्यामुळे आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते.

त्यामुळे मंत्र्यांबरोबरच्या बैठकीनंतरही लॉंगमार्च सुरूच ठेवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी विखे व भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उर्वरित मागण्याही मान्य करण्यात आल्या. मंत्री विखे व दादा भुसे यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित मोर्चेकरांशी संवाद साधला व शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती आंदोलकांना दिली. त्यानंतर लोणी गावाच्या सीमेवर असलेल्या निझर्णेश्वर मंदिर परिसरात लॉन्गमार्च स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली. महसूल, पोलिस तसेच अन्य विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनीही आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली.

डॉ. अजित नवले यांनी अनेक वर्षे सातत्याने संघर्ष करीत कष्टकऱ्यांचा विश्वास संपादन केला. चांगले संघटन उभे केल. त्यांच्या नेतृत्वाखाली सदाशिव साबळे, नंदू डहाणे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, गणेश ताजणे, संगीता साळवे, हेमलता शेळके, तुळशीराम कातोरे, सुमन विरनक, राजाराम गंभीरे, ताराचंद विघे, मथुराबाई बर्डे, आदींनी लाँगमार्च यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.