अमरावती: मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील चिलाटी हे एक अतिदुर्गम भागातील गाव. येथील एक विद्यार्थी खडतर परिस्थितीत शिक्षणाची वाट शोधतो. घरची परिस्थिती गरिबीची. गुरे चारून, शेतातील कामे करून तो आपले शिक्षण पूर्ण करतो. गावात इंटरनेटची सुविधा नाही, मोबाईल नेटवर्कही बेताचेच. घरात कोरकू भाषा, शाळेत मराठी आणि बाहेर व्यवहाराची भाषा हिंदी, अशा आव्हानांचा सामना करत तो शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवतो. किशोर बेठेकर असे या विद्यार्थ्यांचे नाव. पदवीपर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर किशोरला ब्रिटनमधील प्रतिष्ठित विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला असून ५५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

किशोरने अडचणींवर मात कशी केली?

चिलाटी हे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील ४०० लोकसंख्येचे गाव आहे. गावात वीज, रस्ते आणि पिण्याचा प्रश्न कायमचा. किशोर बेठेकरचे वडील लखाजी यांच्याकडे ३ एकर शेती. पण शेतीतून उदरनिर्वाह होत नसल्याने कामासाठी त्यांनाही इतर आदिवासी लोकांप्रमाणेच स्थलांतर करावे लागायचे. किशोरचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने मेळघाटातील आश्रमशाळेत राहून पूर्ण केले. बारावीनंतर पुढे काय, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा झाला, तेव्हा राजू केंद्रे यांनी किशोरला मार्गदर्शन केले आणि त्याने ‘बीएसडब्ल्यू’ला प्रवेश घेतला.

शिक्षणासोबत कामही

किशोर शिक्षणासोबत गुरे चारण्याचे कामही करायचा. शेतात आई-वडिलांना मदतही करायचा. शाळेत जाण्यासाठी कच्चा रस्ता, पायीच चिखल तुडवत जावे लागत होते. पावसाळ्यात तर पुरामुळे गावाचा संर्पकच तुटतो. त्यामुळे शिक्षणात खंड पडत होता. गावात इंटरनेटची सुविधा नाही, मोबाईल नेटवर्कही कमी. विजेचा लंपडाव. अशा प्रतिकूल परिस्थितीत किशोर याने शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द कायम ठेवली.

परदेश शिक्षण शिष्यवृत्ती

किशोरने २०२०-२२ या कालावधीत मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून सामाजिक कार्य या विषयात पदवी घेतली. आता त्याला ब्रिटनच्या ब्रिस्टल विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. परदेश शिक्षण शिष्यवृत्तीमुळे त्याचा उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. शिक्षण शुल्कासह विमान प्रवासाचा खर्च, निवास खर्च आणि इतर शैक्षणिक खर्च शासन उचलणार आहे. आदिवासी विकास आयुक्तालयाने किशोरला उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणारा तो आपल्या गावातील आणि परिसरातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.