नागपूर : उद्योगपती अंबानींच्या मुलाच्या लग्नात नाचणारे आणि अदानींकडून देणग्या स्वीकारणारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही ‘ठाकरे बंधू’ गुजराती विरोधाचे केवळ ढोंग करत आहे, अशी टीका शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले.
राज्यात लोकशाही धोक्यात आहे. येथे धार्मिक व भाषिक द्वेषाच्या राजकारणामुळे सामाजिक सलोख्यावर घाला घातला जात आहे. अलीकडे झालेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमध्ये महायुतीतील भाजप, शिंदे गट व अजित पवार गटाने पैशाच्या जोरावर तसेच अल्पसंख्याक मतदारांना मतदानापासून परावृत्त करून विजय मिळवला. आता मतदार खरेदीऐवजी विरोधी उमेदवार फोडण्याचा ‘राहुल नार्वेकर पॅटर्न’ संपूर्ण राज्यात राबवला जात आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात्मक लोकशाहीचे रूपांतर सत्ताधाऱ्यांकडून हळूहळू तानाशाहीत होत असल्याचा आरोपही किशोर तिवारी यांनी केला. विदर्भात २०२५ साली दररोज सरासरी चार मराठी शेतकरी आत्महत्या करत असताना ‘ठाकरे बंधूंना मराठी माणसाची आठवण का झाली नाही?’ असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला. पश्चिम विदर्भात मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या झाल्या, मात्र या काळात ठाकरे बंधूंनी एकाही शेतकरी कुटुंबाला भेट दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईत मराठी नागरिकांचे होत असलेले विस्थापन, तसेच या प्रश्नांवर शिवसेना व मनसेची भूमिका मौनाची असल्याचेही तिवारी म्हणाले. दुसरीकडे, नमाज व अजानसारखे मुद्दे पुढे करून मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात असून त्यामुळे सामाजिक तणाव वाढत असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला.
अदानी व अंबानी यांच्याविरोधातील ठाकरे बंधूंची भूमिका केवळ दिखाऊ असल्याचा आरोप करत, अदानींकडून देणग्या स्वीकारणे आणि अंबानी यांच्या कुटुंबीयांच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणे हे मराठी जनतेची दिशाभूल असल्याचे तिवारी यांनी म्हटले. गेल्या काही वर्षांत मुंबईतील हजारो एकर जमीन अदानी समूहाला देण्यात आली, मात्र त्यावर ठाकरे बंधू मौन बाळगत असल्याचेही तिवारी यांनी सांगितले.
ओवेसी आणि राज ठाकरे भाजपची ‘बी टीम’
ओवेसी व राज ठाकरे हे भाजपची ‘बी टीम’ म्हणून हिंदू-मुस्लीम तसेच मराठी अमराठी वाद उभे करून महायुतीला अप्रत्यक्ष मदत करत आहे. मागील २५ वर्षांत मुंबईच्या विकासावर निवडणुका न लढवता धर्म, भाषा व जात या मुद्द्यांवर मतांची मागणी करणे अन्यायकारक असल्याचे सांगत, अमराठी भाषिकांना धमकावण्याचे राजकारण हे अप्रत्यक्षपणे भाजपच्या फायद्याचे असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. लोकशाही, सर्वधर्म समभाव, भाषिक सौहार्द व सर्वसमावेशक विकासासाठी काँग्रेस हाच एकमेव व्यवहार्य पर्याय असून, येणाऱ्या निवडणुकांत काँग्रेसला बळकट करण्याचे आवाहन किशोर तिवारी यांनी केले.
