नागपूर : उपराजधानीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आता गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही सुरू झाली आहे. एका चाळीस वर्षीय महिलेवर अलीकडेच गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून सदस महिला अडीच वर्षांनंतर स्वत:च्या पायाने चालू लागली आहे.
सदर महिला काही दिवसांपूर्वी एम्सच्या अस्थिरोग विभागात वाताचा त्रास घेऊन आली. तिला दीड वर्षांपासून स्वत:च्या पायावर चालता येत नव्हते. एक्सरेमध्ये तिचा एक गुडघा पूर्णपने खराब झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी महिलेला गुडघा प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. हे प्रत्यारोपण गुंतागुंतीचे असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. महिलेच्या सहमतीनंतर गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू झाली. याशिवाय, गेल्या महिनाभरात इतर तीन रुग्णांवरही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर महिलेने ‘वॉकर’च्या साह्याने चालणे सुरू केले आहे. महिलेने डॉक्टरांचे आभार मानले.
एम्सचे अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. विवेक तिवारी म्हणाले, गुडघे खराब झालेल्या रुग्णाला गुडघा प्रत्यारोपपणाशिवाय पर्याय नसतो. या प्रकरणात महिला अडीच वर्षांपासून चालली नसल्याने तिचे हाड जास्तच कमकुवत झाले होते. शल्यक्रियेनंतर हाड मजबूत करण्यासाठी औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. लवकरच त्या कोणाच्याही मदतीशिवाय चालू शकतील. या रुग्णाला बधिरीकरणाचे इंजेक्शन देणे खूप आव्हानात्मक होते. परंतु डॉ. ओमशुभम असाई यांच्या चमूने उत्तम काम केले. या शस्त्रक्रियेत एम्सच्या संचालिका व निवृत्त मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांची भूमिका महत्त्वाची होती.
संभावित गुंतागुंत
या प्रकरणात महिलेच्या पायातील हाड वाकडे झाल्यामुळे हाताच्या वेगवेगळय़ा भागातील जोड आणि मणक्यातील हाडावर शल्यक्रियेचा परिणाम होण्याचा धोका होता. परंतु यशस्वी शस्त्रक्रियेने हे धोके टळले.