नागपूर: कोराडी येथील ६६० मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील युनिट क्रमांक १० मध्ये वार्षिक देखभाल-दुरुस्तीचे (ओव्हरहॉलिंग) काम सुरू असताना मंगळवारी रात्री अपघात झाला. बॉयलर विभागात कॉइल्स काढण्याचे काम सुरू असताना मारुती मेश्राम (६१, रा. महरकुडा, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) यांच्या अंगावर लोखंडी रॅक पडला. यात ते गंभीर जखमी झाले. उपचारांसाठी नागपूरला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

कोराडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित शटडाऊननंतर या युनिटमध्ये सध्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. याचे मुख्य कंत्राट ‘लार्सन अँड टुब्रो’ (L&T) कंपनीकडे आहे. या कंपनीने हे काम ‘अधोरे’ कंपनीला दिले होते. त्यांनी पुढे हे काम ‘संपत रेड्डी’ यांना उप-कंत्राटावर दिले होते. सर्व कंत्राटी कामगारांचे गेट पास एल अँड टी समुहाद्वारेच जारी करण्यात आले होते.

रुग्णवाहिका येण्यास विलंब झाल्याने संताप…

अपघातानंतर, रुग्णवाहिका येण्यास कथित विलंब झाल्यामुळे मेश्राम यांना खाजगी वाहनातून नागपूरला नेण्यात आले. कोराडी पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रगत सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित असताना येथील कंत्राटी कामगारांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.