नागपूर : शनिवारी दुपारी चार ते साडेचारच्या सुमारास कोरियन हवाई दलाची तब्बल दहा युद्धविमाने नागपूर विमानतळावर उतरल्याने शहरात एकच खळबळ उडाली. याआधी दुपारी काही मिनिटांसाठी नागपूरच्या आकाशात प्रचंड आवाज करत एक लढाऊ विमान झेपावल्याचे नागरिकांनी अनुभवले. अचानक झालेल्या या गडगडाटामुळे अनेकांचे लक्ष आकाशाकडे वेधले गेले, तर काही काळ नागरिकांमध्ये उत्सुकतेसह घबराटीचे वातावरणही निर्माण झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हे लढाऊ विमान अत्यंत वेगाने आकाशातून गेले. विमानाच्या आवाजामुळे काही भागांत काही क्षणांसाठी दैनंदिन कामकाज थांबले. समाज माध्यमावरही या घटनेचे चित्रफित आणि चर्चेला उधाण आले. दरम्यान, उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार कोरियन हवाई दलाची ही युद्धविमाने नागपूर शहरात दाखल झाली असून, नागपूर विमानतळावर त्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

ही विमाने नेमकी कोणत्या कारणासाठी नागपूरमध्ये आली, याबाबत मात्र अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ही विमाने हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विंग्स इंडिया २०२६’ या आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक प्रदर्शनासाठी आली होती की भारतीय हवाई दलासोबत संयुक्त सरावासाठी नागपूरमध्ये दाखल झाली, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र भारतीय हवाई दलाकडून या दोन्ही शक्यतांपैकी कोणत्याही बाबत अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

‘विंग्स इंडिया २०२६’ हे प्रदर्शन २८ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान हैदराबादच्या बेगमपेट विमानतळावर आयोजित करण्यात आले होते. हा आशियातील सर्वात मोठा नागरी विमानवाहतूक क्षेत्रातील प्रदर्शनी कार्यक्रम मानला जातो. भारतातील वेगाने वाढणाऱ्या विमानवाहतूक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या प्रदर्शनाची संकल्पना “इंडियन एव्हिएशन : पेव्हींग द फ्युचर” अशी होती.

या प्रदर्शनात कनेक्टिव्हिटी, विमाननिर्मिती, तंत्रज्ञान आणि शाश्वततेतील प्रगती मांडण्यात आली होती. एरोबॅटिक शो, ३४ विमानांचे प्रदर्शन तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूक आणि सहकार्याविषयी चर्चा ही या कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणे होती. त्यामुळे कोरियन हवाई दलाची विमाने या प्रदर्शनाशी संबंधित आहेत का, याबाबत नागपूरकरांमध्ये विशेष उत्सुकता आहे.

नागपूर विमानतळावर सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली असून संबंधित यंत्रणा संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अधिकृत माहितीची प्रतीक्षा असली तरी, नागपूरच्या आकाशात झालेला हा गडगडाट मात्र चर्चेचा विषय ठरला आहे.