चंद्रपूर : काँग्रेस व भाजपपाठोपाठ आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेलाही गटबाजीचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. भाजप व काँग्रेस या दोन पक्षांच्या दोन स्वतंत्र बैठका व दोन स्वतंत्र कार्यक्रम जिल्हावासीयांसाठी नवीन नाही. आता यात शिंदेसेनेचीही भर पडली आहे. शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख आमदार कृपाल तुमाने जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी वरोरा शहरात एक आणि चंद्रपूर शहरात दोन, अशा तिन स्वतंत्र बैठका घेतल्या. त्यामुळे शिंदेसेनेतही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आमदार तुमाने शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात शिवसेनेची एकत्रित बैठक घेण्याऐवजी तुमाने यांनी तीन स्वतंत्र बैठका घेतल्या. पहिली बैठक वरोरा येथे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, शिवसेना नेते मुकेश जीवतोडे यांच्या पुढाकाराने झाली.
तुमाने भद्रावती येथून चंद्रपुरात दाखल होताच विश्रामगृहावर त्यांचे स्वागत करण्यात आले. विश्रामगृह येथून थेट श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात चंद्रपूर व बल्लारपूर या दोन विधानसभा मतदारसंघांची त्यांनी बैठक घेतली. जिल्हा प्रमुख युवराज धानोरकर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यानंतर तिसरी बैठक राजुरा व ब्रह्मपुरी मतदारसंघाचे प्रमुख बंडू हजारे यांच्या उपस्थितीत विश्रामगृह येथे पार पडली.
गटबाजीमुळे आमदार तुमाने यांना तीन स्वतंत्र बैठका घ्याव्या लागल्याने कार्यकर्त्यांना चांगलीच धावपळ करावी लागली. विशेष म्हणजे, भद्रावती-वरोरा मतदारसंघाला नितीन मत्ते यांच्या रूपात स्थानिक जिल्हाप्रमुख देण्यात आला आहे. मात्र मूळचे चंद्रपूरचे रहिवासी माजी नगरसेवक बंडू हजारे यांच्याकडे चंद्रपूर विधानसभेची जबाबदारी सोपविण्याऐवजी त्यांच्याकडे राजुरा व ब्रह्मपुरी या दोन विधानसभेची जबाबदारी सोपवली आहे, तर मूळचे भद्रावतीचे रहिवासी असलेले युवराज धानोरकर यांच्याकडे चंद्रपूर व बल्लारपूर या दोन मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिदे सेनेने स्थानिक पदाधिकाऱ्याकडे जबाबदारी न सोपवल्याने महापालिका निवडणुकीत अपयश आले. शिवसेनेचा केवळ एक नगरसेवक निवडून आला. गटबाजी अशीच कायम राहिल्यास यापेक्षा वाईट दिवस येतील, असे पदाधिकारी व कार्यकर्ते एकांतात बोलत आहेत.
लाडक्या बहिणींना २०२९ मध्ये ३३ टक्के आरक्षण
३३ टक्के महिला आरक्षणाचा विषय नवीन संसद भवनात २०२३ मध्ये सर्वप्रथम शिवसेने खासदारांनीच मांडल्याचे तुमाने यांनी सांगितले. २०२७ मध्ये जनगणना पूर्ण करून मतदारसंघांची पुनर्रचना केल्यानंतर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत देशातील महिलांना अर्थात लाडक्या बहिणींना ३३ टक्के आरक्षण लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींसाठीच आम्ही महिला आरक्षणाचा विषय लावून धरला असल्याची माहितीही त्यांनी दिली. पक्ष संघटना बळकटीकरणावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे प्रत्येक गावात बुथ प्रमुख तसेच गाव तिथे शाखा अभियान राबविणार आहे. अपयशी पदाधिकाऱ्याला घरी बसावे लागेल, असेही आमदार तुमाने यांनी स्पष्ट केले.
