वर्धा: मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ता पुनरूज्जीवन प्रकल्प राबविण्याचे ठरल्यानंतर १७ सप्टेंबरला नांबिया येथून ८ व दक्षिण आफ्रिकेतून १२ असे चित्ते कुनोत सोडण्यात आले होते. दरम्यान यांचा मोठा वंश विस्तार झाला. संख्या वाढली. इतकी ते सीमा ओलांडू लागले. एक चित्ता थेट राजस्थान येथे दिसला असून त्याच्यावर देखरेख ठेवल्या जात आहे. मात्र काहींचा मृत्यू पण झाला. पण संख्या वाढू लागली. यापैकीच एक निरवा या मादीने ४ पिल्लांना जन्म दिला. पण तिनेच झोप उडविल्याची ही घटना आहे.

कुनो प्रोजेक्ट संचालक

या घटनेबद्दल कुनोचे क्षेत्र संचालक उत्तमकुमार शर्मा यांनी समाज माध्यम व्यासपीठ एक्स अकाऊंटवर खुलासा केला आहे. ते म्हणतात की निरवा मादीच्या गळ्यातील सॅटेलाईट कॉलरचा संपर्क तुटला होता. पण आमच्या वन्य विभागाच्या चमुने अथक परिश्रम घेतले आणि निरवा अखेर तिच्या अधिवासात पोहचली आहे, हे खरे. मादी चित्ता ‘निरवा’ (Nirwa) गेली २१ दिवस बेपत्ता होती. तिच्या गळ्यातील सॅटेलाइट कॉलर अचानक निकामी झाल्याने वन विभागाची झोप उडाली होती. मात्र, तब्बल तीन आठवड्यांच्या अथक शोधानंतर वन कर्मचाऱ्यांनी निरवाला सुरक्षितपणे शोधून काढले असून तिला पुन्हा सुरक्षित कुंपणात हलवण्यात आले आहे. निरवा सुरक्षित सापडल्याने प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी या घटनेने वन्यजीव व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

निरवा बेपत्ता आणि शोधाशोध

तब्बल २१ दिवस निरवा गायब झाली होती. तिला शोधायचे कसे, हा मोठा प्रश्न उद्भवला होता. कारण धुंद पावसाळा, घनदाट जंगल, अपुरे मनुष्यबळ व अन्य अडचणी समोर होत्या. कुनोच्या घनदाट जंगलात वन्यजीवांचा मागोवा घेणे अत्यंत कठीण असते. सततचा पाऊस आणि दाट झाडीमुळे प्रत्यक्ष पाहणी करणे अशक्य ठरते. त्यातच निरवाच्या गळ्यातील ‘रेडिओ सॅटेलाइट कॉलर’ने सिग्नल देणे पूर्णपणे बंद केले. त्यामुळे तिच्या ठावठिकाण्याबद्दल कोणतीही अचूक माहिती प्रशासनाला मिळत नव्हती. प्रतिकूल हवामान आणि भौगोलिक अडचणी असूनही, कुनोच्या ग्राउंड टीमने रात्रं-दिवस शोधमोहीम सुरूच ठेवली. अखेर २१ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर निरवाला सुखरूप शोधण्यात यश आले.

रेडिओ कॉलरचा बिघाड व चौकशीची मागणी

निरवा अखेर सुखरूप सापडली. पण हे असे तांत्रिक बिघाड चर्चेत आले आहे. अत्यंत महागडा आणि आधुनिक मानला जाणारा रेडिओ कॉलर अचानक कसा निकामी झाला? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे यांनी या प्रकरणी थेट केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री तसेच राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडे (NTCA) लेखी तक्रार दाखल केली असल्याचे वृत्त पुढे आले आहे. रेडिओ कॉलरच्या तांत्रिक अपयशाची आणि त्यामागील कारणांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या तक्रारीत केवळ कॉलर बिघाडाचाच उल्लेख नाही, तर कुनोमध्ये अलीकडेच झालेला ‘इलू’ आणि ‘रुबी’ या दोन महत्त्वाच्या स्निफर डॉग्सचा संशयास्पद मृत्यू, अभयारण्यातील व्यवस्थापनातील निष्काळजीपणा आणि शिकारीच्या संभाव्य धोक्यांबाबतही स्वतंत्र तपासाची मागणी करण्यात आली आहे.

प्रकल्पापुढील आव्हाने व भविष्य

कुनोतील मादी चित्ता निरवा सुरक्षित परतली. त्यामुळे भारत सरकारच्या ‘चित्ता पुनर्वसन मोहिमेला’ मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु पावसाळ्यात आणि विशाल अभयारण्यात चित्त्यांचे डिजिटल मॉनिटरिंग करणे किती धोक्याचे ठरू शकते, हे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले असल्याचे म्हटल्या जाते. कॉलर सिग्नल का बंद पडला आणि तीन आठवडे मागोवा का घेता आला नाही, याचा सखोल अभ्यास करून भविष्यात अशा तांत्रिक चुका टाळण्यासाठी वन विभागाला आता कठोर पावले टाकावी लागणार.

निवृत्तीपर शर्मा म्हणतात

‘प्रोजेक्ट चित्ता’चे संचालक उत्तम कुमार शर्मा यांनी आपल्या भावना एक्सवर व्यक्त केल्या आहेत.ते म्हणतात, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी या पदावरील आपला चार वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण होतो. या ४ वर्षाच्या प्रवासात अनेक आव्हाने आणि टीकांचा सामना करावा लागला. सुरुवातीला “कुनोमध्ये चित्ते जगू शकणार नाहीत” इथपासून सुरू झालेला संशय आज मागे पडला आहे.

४ वर्षानंतर आता ५२ चित्ते

याच एक्स फोरमवर व्यक्त होतांना शर्मा सांगतात की सध्या देशात एकूण ५२ चित्ते असून ते दोन वेगवेगळ्या अधिवासांमध्ये वसलेले आहेत. यामध्ये कुनो राष्ट्रीय उद्यानात ४९ आणि गांधी सागर अभयारण्यात ३ चित्ते आहेत. ही बाब समाधान देणारी आहे. “चित्ता केवळ एक प्राणी नसून तो आमचा शिक्षक आहे,” असे शर्मा यांनी नमूद केले. त्यांना जंगलात मुक्त करण्यापर्यंतच्या प्रवासात प्रत्येक दिवशी नवीन धडे शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.आपण कितीही नियोजन केले तरी निसर्ग आणि प्राणी स्वतःचे निर्णय घेतात. त्यामुळे परिस्थितीनुसार बदलणे हेच या प्रकल्पाचे मोठे यश आहे, अशी भावना शर्मा यांनी व्यक्त केली.