वर्धा : भारतात चित्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रकल्प चित्ता राबविल्या जात आहे. भारतातील गवताळ प्रदेश व खुल्या जंगलाची परिसंस्था जीवित ठेवणे व जैव विविधतेला चालना देण्याहेतूने हा प्रकल्प सूरू झाला. त्यासाठी नामिबिया येथून २०२२ मध्ये ८ चित्ते आणल्या गेले. २०२३ मध्ये १२ चित्ते आणण्यात आले. त्यांचा निवास कुनो राष्ट्रीय उद्यान हे ठरले. विस्तीर्ण गवताळ प्रदेश व शिकारीसाठी चितळ, चौशिंगा आदी प्राणी मुबलक प्रमाणात म्हणून कुनोची निवड. मात्र आता अनुभव वेगळाच. कारण हे चित्ते जंगलातील भक्ष्य सोडून इतरत्र पळत आहे.
धक्कादायक अहवाल पुढे
मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात (Kuno National Park) आफ्रिकन चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट चित्ता’बाबत एक अत्यंत रंजक आणि तितकाच धक्कादायक अहवाल समोर आला आहे. जंगलात मुक्तपणे संचार करणाऱ्या चित्त्यांनी केलेल्या एकूण शिकारींपैकी तब्बल ५० टक्के शिकार ही जंगलातील हरीण किंवा चितळांची नसून, पाळीव शेळ्या आणि गुरांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रगती अहवालातून ही माहिती समोर आली असून, चित्त्यांच्या या बदलत्या सवयींमुळे वन्यजीव वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. The Indian Express ने या संदर्भात वृत्त दिले आहे.
हरणांपेक्षा पाळीव प्राण्यांना पसंती
अहवालानुसार, कुनो आणि आसपासच्या परिसरात मुक्तपणे वावरणाऱ्या १९ चित्त्यांच्या शिकारीचा सखोल अभ्यास करण्यात आला. यामध्ये असे दिसून आले की, चित्त्यांच्या एकूण यशस्वी शिकारींमध्ये त्यांचे मुख्य नैसर्गिक भक्ष्य मानल्या जाणाऱ्या ‘चितळांचे’ (Spotted deer) प्रमाण केवळ ४२ टक्के आहे. याउलट, पाळीव शेळ्यांचे प्रमाण ३० टक्के आणि पाळीव गुरांचे (गायी-बैल) प्रमाण २० टक्के इतके मोठे आहे. उर्वरित शिकारींमध्ये निलगाय (२ टक्के), ससे, सांबर, चिंकारा आणि रानडुक्कर (प्रत्येकी १ टक्का) यांचा समावेश आहे. म्हणजेच शेळ्या आणि गुरे मिळून एकूण शिकारीचा अर्धा हिस्सा बनतो.
यामागचं मुख्य कारण
चित्त्यांनी आपला मोर्चा पाळीव प्राण्यांकडे का वळवला, यावर ‘प्रोजेक्ट चित्ता’चे संचालक उत्तम कुमार शर्मा यांनी प्रकाश टाकला आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य (Core) क्षेत्रात हरणांची संख्या समाधानकारक आहे; तिथे प्रति चौरस किलोमीटर मागे सुमारे २३ चितळे आहेत. मात्र, हे चित्ते जेव्हा राष्ट्रीय उद्यानाची सीमा ओलांडून बाहेरील प्रादेशिक वनक्षेत्रात किंवा मानवी वस्तीच्या जवळ असलेल्या भागात जातात, तिथे जंगली भक्ष्याची संख्या खूपच कमी आहे. अशा भागात भूक भागवण्यासाठी चित्ते पाळीव प्राण्यांना सहज लक्ष्य करत आहेत. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, हा चित्त्यांचा नवीन वातावरणाशी ‘पर्यावरणीय जुळवाजुळव’ (Ecological Adjustments) करण्याचा एक भाग आहे.
पिल्लांच्या संगोपनासाठी वाढली शिकार
अहवालात नमूद केल्याप्रमाणे, ज्या मादी चित्त्यांना पिल्ले आहेत, त्यांच्या शिकारीचे प्रमाण आणि वारंवारता अधिक आहे. ‘ज्वाला’ आणि ‘गामिनी’ या मादी चित्त्यांनी पिल्लांच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पाळीव प्राण्यांवर अधिक भर दिला. ‘ज्वाला’ आणि तिच्या पिल्लांच्या शिकारीत शेळ्यांचे प्रमाण तब्बल ४० टक्के होते. दुसरीकडे, ‘अग्नी’ आणि ‘वायू’ या नर चित्त्यांनी ३९ टक्के हरणे, २६ टक्के गुरे आणि १९ टक्के शेळ्यांची शिकार केली.
चित्त्यांचा वाढता विस्तार
हे चित्ते आता केवळ कुनो उद्यानापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. त्यांनी मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील तब्बल १२ जिल्ह्यांपर्यंत आपला वावर वाढवला आहे. सध्या भारतात ‘प्रोजेक्ट चित्ता’ अंतर्गत एकूण ५३ चित्ते आहेत, ज्यात १३ प्रौढ, १७ उप-प्रौढ आणि २३ पिल्लांचा समावेश आहे. चित्ते आणि स्थानिक गावकरी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी आता वनविभागाकडून विशेष जनजागृती आणि उपाययोजना केल्या जात आहेत.
