बुलढाणा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात नोंद असलेल्या कामगारांसाठी मध्यान्ह भोजन बनवणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या चिखली तालुक्यातील बेराळा फाट्याजवळील ‘जस्ट किचन’मध्ये मंगळवारी एका मजुराचा बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पर्यवेक्षक आणि मुकादमाने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत आणि आरोपी तिघेही परप्रांतातील रहिवासी आहेत.

चिखली शहरानजीक मेहकर फाट्यापासून चार कि.मी. अंतरावर बेराळा फाट्याजवळ ‘जस्ट किचन प्रा.लि.’मध्ये जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांसह अन्य कामगारांसाठी मध्यान्ह भोजन बनवण्यात येते. १६ ऑगस्टला पहाटे चार वाजता येथे मुहंमद हुसेन मुहंमद नरवे जमाल (३४, रा. बान्नो, पश्चिम बंगाल) हा कामाला होता. पर्यवेक्षक मुन्नाभाई ऊर्फ मुहंमद मुज्जमिल शेख (४२, झेंडापूर ता. बिरपूर जि. भागापूर, बिहार) व मुकादम हसमुख ऊर्फ मुहंमद इमदादुल लष्कर (२१, लिलबगान, ता. हजई, जि. नावगाव, आसाम) यांच्यासोबत किरकोळ कारणावरून त्याचा वाद झाला. पर्यवेक्षक व मुकादमाने मुहंमद हुसेनला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अशोक लांडे घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.