नागपूर : लडाखच्या अल्पाइन पाणथळ प्रदेशात काळ्या मानेच्या सारसांच्या पिलांवर मुक्त संचार करणाऱ्या कुत्र्यांचा वाढता धोका लक्षात घेऊन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने आतापर्यंत २,९५० हून अधिक कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. मुक्त संचार करणारे कुत्रे सारसांच्या घरट्यांजवळ जाऊन अंडी आणि पिलांची शिकार करतात. तसेच त्यांच्या वावरामुळे सारसांना एका ठिकाणी स्थिर होऊन घरटी करणेही अवघड होत असल्याचे बीएनएचएसच्या निरीक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्याबरोबरच त्यांना उपलब्ध होणारे मानवी अन्नाचे स्रोत कमी करण्यावरही भर देण्यात येत आहे.

कचरा व्यवस्थापनावरही भर

लडाखमधील मानवी वस्ती, पर्यटन आणि विविध संस्थांमधून निर्माण होणारा अन्नकचरा हा मुक्त संचार करणाऱ्या कुत्र्यांसाठी सहज उपलब्ध अन्नस्रोत ठरत आहे. त्यामुळे निवडक भारतीय लष्करी चौक्यांवर कचरा व्यवस्थापनाचा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. स्वयंपाकघरातील आणि अन्नाशी संबंधित कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून कुत्र्यांना मिळणारे अन्न कमी करण्याचा प्रयत्न यात केला जात आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि अन्नकचरा व्यवस्थापन या दोन्ही उपायांचा एकत्रित वापर केल्यास पाणथळ प्रदेशांवरील कुत्र्यांचा दबाव दीर्घकाळ कमी करता येईल, असा प्रयत्न आहे. संवर्धनाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सुमारे एक हजार सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना जैवविविधता संवर्धन आणि वन्यजीव व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे लडाखच्या संवेदनशील परिसंस्थेचे स्थानिक पातळीवर संरक्षण करण्यासाठी अधिक सक्षम मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होत आहे.

२०२६ मध्ये १९ प्रजननक्षम जोड्या

बीएनएचएसकडून लडाखमधील काळ्या मानेच्या सारसांच्या प्रजननक्षम लोकसंख्येचे नियमित निरीक्षण केले जाते. जून २०२६च्या सुरुवातीला करण्यात आलेल्या वार्षिक पाहणीत लडाखमधील पाणथळ प्रदेशात सारसांच्या १९ जोड्या आढळून आल्या, अशी माहिती बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांनी दिली. मात्र, दुर्गम आणि दुर्गमतेमुळे पोहोचणे कठीण असलेल्या काही ठिकाणांचे सर्वेक्षण या वेळी करता आले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष प्रजननक्षम जोड्यांची संख्या १९पेक्षा काहीशी अधिक असण्याची शक्यता आहे. बीएनएचएसचे लडाखमधील शास्त्रज्ञ डॉ. मुहम्मद रझा यांनी ही संख्या सध्याचा सावध अंदाज असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रजननक्षम लोकसंख्येचे अधिक अचूक चित्र मिळविण्यासाठी संस्थेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

लडाखच्या संस्कृतीतील महत्त्वाचा पक्षी

काळ्या मानेचा सारस हा लडाखचा राज्य पक्षी असून स्थानिक बौद्ध संस्कृतीत त्याला विशेष स्थान आहे. शांतता, पवित्रता आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून या पक्ष्याकडे पाहिले जाते. वसंत ऋतूमध्ये सारसांचे आगमन हे नवचैतन्य आणि शेतीच्या हंगामाच्या सुरुवातीचे संकेत मानले जातात. त्यामुळे स्थानिक समुदायांकडून त्यांच्या घरट्यांना आणि प्रजननस्थळांना तुलनेने कमी त्रास दिला जातो. लडाखमधील चांगथांग परिसरातील पाणथळ प्रदेश, हान्ले, त्सो कार, न्योमा तसेच सुरू खोऱ्यातील काही भाग हे या पक्ष्यांच्या प्रजननासाठी महत्त्वाचे अधिवास आहेत. भारतातील या पक्ष्यांची संख्या अत्यल्प असून जागतिक पातळीवरही त्याचा समावेश ‘असुरक्षित’ प्रजातींमध्ये करण्यात आला आहे. काळ्या मानेचा सारस हे लडाखचे सांस्कृतिक प्रतिक आणि राज्यपक्षी आहे, पण भारतात त्यांची संख्या १०० पेक्षा कमी उरली आहे. त्यांची अंदाजित जागतिक लोकसंख्या सुमारे ११ हजार ते १२ हजार इतकी असून त्यातील बहुतांश पक्षी तिबेटी पठारावर आढळतात. हे पक्षी भारत, नेपाळ, भूतान आणि चीन या चार देशांमध्ये आढळतात.

पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्व

लडाखमध्ये वन्यजीव पर्यटनाचा विस्तार होत असताना काळ्या मानेच्या सारसासारख्या दुर्मीळ पक्ष्यांचे संरक्षण स्थानिक अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचे ठरत आहे. पाणथळ प्रदेशांचे संवर्धन, कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे आणि कचरा व्यवस्थापन यामुळे सारसांचे प्रजननस्थळ सुरक्षित होण्याबरोबरच भविष्यात वन्यजीव पर्यटनावर आधारित स्थानिक उपजीविकेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, मानवी वस्तीचा विस्तार, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांची वाढ, पर्यटनाचा वाढता दबाव, अधिवासाचा ऱ्हास आणि हवामान बदल या सारसांसमोरील इतर आव्हानांवरही दीर्घकालीन उपाय करणे आवश्यक आहे. केवळ कुत्र्यांची संख्या कमी करून हा प्रश्न सुटणार नसून त्यांच्या वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या मानवी अन्नस्रोतांवर नियंत्रण आणि पाणथळ अधिवासांचे संरक्षणही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.