नागपूर : हिमालयीन परिसंस्थेचे संरक्षण करतानाच पर्यटकांना नियंत्रित आणि जबाबदार पद्धतीने वन्यजीव दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी लडाख प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्रशासित प्रदेशात भारतातील पहिल्या उच्च हिमालयीन वन्यजीव सफारीला मंजुरी देण्यात आली असून, हिमबिबट्या, दुर्मीळ पक्षी आणि उच्च हिमालयीन जैवविविधता अनुभवण्यासाठी मार्गदर्शित जीप सफारी सुरू करण्यात येणार आहे. वन्यजीवांच्या अधिवासात वाढत असलेल्या बेकायदा ऑफ-रोडिंगमुळे होणारा व्यत्यय कमी करण्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
भारतातील सर्वाधिक हिमबिबटे
भारतातील सर्वाधिक हिमबिबटे लडाखमध्ये आढळतात. देशातील अंदाजे ७१८ हिमबिबट्यांपैकी ४७७ हिमबिबट्यांचा अधिवास लडाखमध्ये असल्याचे अधिकृत आकडेवारीत नमूद आहे. याशिवाय येथे ३८ हून अधिक सस्तन प्राणी, सुमारे ३४० पक्षी प्रजाती आणि १,८०० हून अधिक वनस्पती प्रजाती आढळतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत हिमबिबट्याचे दर्शन आणि पक्षीनिरीक्षणासाठी देश-विदेशातील पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या स्नो लेपर्ड अँड हाय-अल्टिट्यूड नेचर (SHAN) कन्झर्व्हेशन सोसायटीच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना होते. त्यांनी काझीरंगा, रणथंबोर आणि इतर प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानांच्या धर्तीवर विशेष खुल्या मागील भागाच्या (ओपन-बॅक) वाहनांमधून मार्गदर्शित जीप सफारी सुरू करण्याचे निर्देश वन विभागाला दिले. या सफारीसाठी स्थानिक चालक आणि वन्यजीव मार्गदर्शकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
युवकांना प्राधान्य आणि प्रशिक्षण
नुब्रा, झंस्कार, शाम, कारगिल आणि द्रास या भागांमध्ये हिमबिबट्याची उपस्थिती आणि समृद्ध पक्षीवैविध्य लक्षात घेऊन प्राथमिक स्तरावर सफारी मार्ग निश्चित केले जाणार आहेत. तसेच हेमिस राष्ट्रीय उद्यान, चांगथांग आणि काराकोरम वन्यजीव अभयारण्यांमध्येही अशा सफारीसाठी योग्य मार्गांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे स्थानिक समुदायाचा सहभाग. सुरुवातीच्या टप्प्यात २० स्थानिक युवकांची निवड करून त्यांना पक्षीनिरीक्षण, पक्षी ओळख, हिमबिबट्याचा मागोवा घेण्याच्या पद्धती आणि पर्यटकांना मार्गदर्शन यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक उपकरणेही प्रशासनाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लडाखची ओळख निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे
यावर्षी १६ जून रोजी स्थापन झालेल्या SHAN कन्झर्व्हेशन सोसायटीचे उद्दिष्ट स्थानिक समुदायाच्या सहभागातून वन्यजीव संवर्धन, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त पर्यटन, शाश्वत उपजीविका आणि जबाबदार पर्यटनाला चालना देणे हे आहे. या निर्णयाबाबत नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना म्हणाले, लडाखचा नैसर्गिक वारसा पुढील पिढ्यांसाठी अधिक समृद्ध आणि सुरक्षित ठेवणे हे आमचे ध्येय आहे. समुदायाच्या सहभागातून संवर्धन आणि जबाबदार उच्च हिमालयीन पर्यटनाचे जागतिक मॉडेल म्हणून लडाखची ओळख निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल.
