अमरावती: रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण (ladkibahin) योजनेतील सुमारे १ कोटी ६५ लाख महिलांच्या बँक खात्यात ओवाळणी जमा केली होती. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जुलैचा हप्ता मिळाला, आता ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, ई-केवायसीबाबत संभ्रम कायम आहे.
गणेश चतुर्थीला हप्ता मिळणार का?
लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा केव्हा मिळेल, याविषयी सरकारकडून अद्याप माहिती देण्यात आली नसली, तरी गणेशोत्सवाच्या काळात हा निधी जमा केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महिलांच्या खात्यावर १ हजार ५०० रुपये जमा होण्याचे संकेत आहेत. काही महिन्यांपुर्वी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात आले होते. त्यामुळे या महिलांना पुन्हा ई-केवायसीची संधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, अद्याप यासंदर्भात स्पष्टता मिळाली नसल्याने संभ्रम कायम आहे.
अपात्र महिलांना संधी मिळणार का?
लाडकी बहीण योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा १ हजार ५०० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांहून कमी आहे. तसेच ज्या महिलांचे वय २१ ते ६५ वर्षांदरम्यान आहे, अशांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. त्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली. योजनेच्या निकषांत न बसणाऱ्या सुमारे ९२ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले. लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी वारंवार संधी देण्यात आली. पण, त्यांनी ही प्रक्रिया केली नसल्याने यातील बहुतांश महिला अपात्र ठरल्या, असे सरकारचे म्हणणे आहे. पुन्हा ई-केवायसी सुरू होणार, अशी विचारणा अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांकडून केली जात आहे, मात्र अद्याप सरकारने याविषयी निर्णय घेतलेला नाही.
लाभार्थ्यांची पडताळणी सुरूच
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या पात्रतेची पडताळणी अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे लाभार्थींच्या संख्येत दर महिन्याला काही प्रमाणात बदल होत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये साधारणपणे ६५ वर्षांची वयोमर्यादा पूर्ण झालेल्या महिला, तसेच आधार प्रमाणीकरण, बँक खात्याविषयी अपूर्ण माहिती किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे अनेक महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे आता अपात्र महिलांना शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
