अकोला : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणी शिवसेनेच्या पाठीशी होत्या. त्यावेळी शिवसेनेला मोठे यश मिळाले. पाठीशी लाडक्या बहिणी असतात, तेव्हा शिवसेनेचा विजय नक्कीच होतो. या निवडणुकीत देखील तसेच होईल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी वाशीम जिल्ह्यातील मालेगांव येथे व्यक्त केली. यावेळी जाहीर सभेमधूनच उद्योगमंत्र्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत रोजगार निर्मितीसाठी मालेगाव येथे मोठा उद्योग आणण्याची सूचना एकनाथ शिंदे यांनी केली.

वाशीम जिल्ह्यातील नगर पालिका व नगर पंचायतमधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मालेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार भावना गवळी यांच्यासह पक्षाचे उमेदवार उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “सभेला लाडक्या बहिणींची उपस्थिती अधिक आहे. जेव्हा पाठीशी लाडक्या बहिणी असतात, तेव्हा शिवसेनेचा विजय नक्की होतो. या निवडणुकीत देखील तसेच होईल. नगर पालिकेला पाणी पुरवठा योजनेसाठी नगरविकास विभागाने ६५ कोटी रुपये दिले आहेत. शहरात चांगले रस्ते व्हावे यासाठी देखील निधी देऊ, या ठिकाणी सगळ्यात मोठा जनावरांचा बाजार भरतो, त्या ठिकाणी सोयी उपलब्ध करून दिल्या जातील. हा बाजार वाशीम, मालेगावमधील व्यापाराचे हायटेक केंद्र बनवू, असे त्यांनी नमूद केले. सभेला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोठ्या उद्योगासाठी तत्काळ बैठक

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत मालेगावमध्ये तत्काळ एखादा मोठा उद्योग आणावा आणि स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा, असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेतून सांगितले. यावर आचारसंहिता संपल्यावर तत्काळ बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. तसेच समृद्धीच्या नोडमध्ये कृषी समृध्दी केंद्र देखील उभारू, असे सुद्धा जाहीर सभेमध्ये सांगण्यात आले.

शिवसेना शिंदे गटासाठी निवडणूक आव्हानात्मक

वाशीम जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट रिसोड वगळता सर्वच ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढत आहे. रिसोड पालिकेत भाजपसोबत शिंदेसेना युतीत आहे. विधानसभा निवडणुकीत रिसोडमध्ये शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता ही स्थानिक निवडणूक शिवसेनेसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत. स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांसाठी अस्तित्वाचा प्रश्न राहील.