लोकसत्ता टीम
नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनाच्या आधारावर राज्यातील महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा मानस सत्ताधाऱ्यांचा आहे. राज्यात विधानसभा निवडणूकीची घोषणा झाली असून लाडकी बहिण योजनेचा आधार प्रचारासाठी केला जात आहे.
राज्यात निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहिण योजनेच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना लाडकी बहिणसारख्या योजनेच्या माध्यमातून राज्य शासन मोफत पैसे का वाटत आहे, असा सवाल उपस्थित करत वडपल्लीवार यांनी अशा योजना बंद करण्याची मागणी न्यायालयात केली. न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर राज्यातील राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता याचिकाकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा दावा करत पोलीस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
न्यायालयाने पोलिसांना दिले ‘हे’ आदेश
सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी स्वत:च्या जीवाला धोका असल्याचा दावा न्यायालयात केला. या प्रकरणावर न्या. विनय जोशी आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. संबंधित योजनांना विरोध केल्यामुळे जीवाला धोका आहे, असे वडपल्लीवार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी पोलिस आयुक्तांना ३० सप्टेंबर रोजी अर्ज सादर करून पोलिस सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उल्लेखनीय म्हणजे वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयात लाडकी बहीण योजनेच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयात याचिका दाखल केल्यावर वडपल्लीवार यांच्या विरोधात राजकीय नेत्यांनी भाष्य केले होते. यानंतर वडपल्लीवार यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. वडपल्लीवार यांनी याबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार केली व पोलीस सुरक्षेची मागणी केली. मात्र पोलिसांनी यावर सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने याप्रकरणी पोलिसांना जलद गतीने निर्णय घेण्याची सूचना केली.
आणखी वाचा-‘ मला आमदार करायला निघाले होते, आता पत्नीसाठी अडून ‘ या इच्छुकाने डागली खासदारावर तोफ
आज पुन्हा सुनावणी
वडपल्लीवार यांनी लाडकी बहिण योजनेच्या विरोधात न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीत न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावत योजनेच्या वैधतेबाबत भूमिका मांडण्याचे आदेश दिले होते. राज्यात विधानसभा निवडणूकीची घोषणा झाल्यावर पहिल्यांदाच न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी होणार असल्याने राज्याचे याकडे लक्ष लागले आहे.