नागपूर : राज्यातील ८१ लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस अपात्र ठरल्या असून त्यांचा लाभ बंद झाला आहे. यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टिकेचे अस्त्र उगारल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढे आले. त्यांनी पुन्हा समितीमार्फत तपासणी होणार असून पात्र महिलांना न्याय दिला जाईल, असे सांगितले.

लाडकी बहिण योजनेतील अपात्र महिलांची संख्या ८१ लाख आहे. यावरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी ८० लाख महिलांना अपात्र ठरवणे हे राज्याच्या गंभीर आर्थिक संकटाचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. आमदार रोहित पवार यांनी ‘ई-केवायसी’ करणे हा केवळ एक बहाणा असून, लाभार्थी महिलांची संख्या कमी करून योजना गुंडाळण्याचा सरकारचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशीच गत झाल्याचा आरोप केला. यावर आता महायुती सरकारमधील मंत्र्यांना स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. आज, सोमवारी नागपुरात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडक्या बहिणी योजनेतील पात्रता पुनर्तपासणी होणार असल्याचे सांगितले. काही नावे निकषांबाहेर असल्याने वगळण्यात आली आहेत. मात्र अशा प्रकरणांची पुन्हा समितीमार्फत तपासणी होणार असून पात्र महिलांना न्याय दिला जाईल, असे त्यांनी नमुद केले.

महायुतीचा १७ पैकी १७ जागांवर विजय निश्चित

विधानपरिषद निवडणुकीत १७ पैकी १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होणार असून महायुतीला केवळ विजयच नव्हे तर मोठा विजय मिळेल, असा दावा बावनकुळे यांनी व्यक्त केला. राज्यातील जागावाटपाचा निर्णय महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी एकमताने घेतला असून भारतीय जनता पक्ष ११, शिवसेना (शिंदे गट) ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २ जागांवर निवडणूक लढवणार असून महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमरावतीच्या संदर्भात माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी दोघेही प्रगल्भ नेते असून काही स्थानिक मतभेद असले तरी ते महायुतीसोबतच राहतील, असे स्पष्ट केले. मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

वडेट्टीवार, राऊतांना टोला

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसने स्वतःच्या नगरसेवकांमध्ये नाराजी का निर्माण झाली याचा आत्मपरीक्षण करावे. महिलांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी काँग्रेसवर टीका करत महिला आरक्षण विधेयकाला पूर्ण पाठिंबा न दिल्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्याची संधी गमवावी लागल्याचा आरोप केला. संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राष्ट्रहित, विकास आणि विकसित भारताच्या संकल्पनेशी संबंधित अनेक मुद्द्यांमुळे मोदींजीबद्दलचा आदर अधिक वाढतो, असे त्यांनी सांगितले.