गडचिरोली : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत घडलेल्या विषबाधा प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत शाळेचे मुख्याध्यापक डी. जी. रापंजी आणि अधीक्षक एम. एम. पाटील यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच, अधिक्षिका व पाच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचे आदेश भामरागडचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी दिले आहेत.
२८ जानेवारी रोजी लाहेरी आश्रमशाळेतील जवळपास ७० विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली होती. मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या विद्यार्थ्यांना तातडीने लाहेरी, भामरागड आणि अहेरी येथील रुग्णालयांत हलवण्यात आले होते. या घटनेनंतर स्थानिक आमदार डॉ. नरोटे यांनीही शाळेला भेट देऊन येथील दुरावस्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता. प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी प्रत्यक्ष शाळेची पाहणी केली असता, धक्कादायक बाबी समोर आल्या.
शाळेच्या स्वयंपाकगृहात कमालीची अस्वच्छता होती. इतकेच नव्हे तर, विद्यार्थ्यांना देण्यासाठी ठेवलेली फळे, धान्य व भाजीपाला सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. निलंबन काळात मुख्याध्यापक रापंजी यांचे मुख्यालय जांबिया (एटापल्ली), तर अधीक्षक पाटील यांचे मुख्यालय हालेवारा येथे ठेवण्यात आले आहे.
या रिक्त पदांचा प्रभार तातडीने उच्च माध्यमिक शिक्षक आर. एन. हारमे आणि वरिष्ठ लिपिक वैभव देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या कारवाईमुळे आश्रमशाळा प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत हयगय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. मात्र, आश्रम शाळेत खाद्य पुरवठा करणाऱ्या पुरवठादारावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही.

