नागपूर : नागपुरातील धरमपेठमसारख्या उच्चभ्रूंच्या वस्तीत असलेला लाहोरी बार हा नेहमीच गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये झालेल्या वादामुळे चर्चेत राहत आला आहे. सध्या राज्यभर गाजत असलेल्या हिट अ‍ॅण्ड रन अपघात प्रकरणातील आरोपी याच बारमधून बाहेर पडले होते, त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

संकेत बावनकुळे हा मित्रांसह याच बारमधून मध्यरात्री बाहेर पडला होता. त्याच्या मालकीच्या ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिली होती. लाहोरी बारवर आतापर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे त्याच्यावर वरदहस्त कुणाचा? असा प्रश्न विचारला जात आहे.

हेही वाचा – मुलींनो, मित्राला भेटायला थेट हॉटेलच्या खोलीत जाऊ नका.. उच्च न्यायालयाचा सल्ला!

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची वर्दळ

धरमपेठमधील लाहोरी बार अ‍ॅण्ड रेस्ट्रॉरेंटमध्ये नोव्हेंबर २०१६ मध्ये शेखू खान आणि सुमित चिंतलवार टोळींमध्ये लाहोरी बारमधूनच टोळीयुद्ध भडकले होते. सुमितच्या माया गँगचा सदस्य रोशनच्या प्रेयसीची छेड शेखूच्या टोळीच्या सदस्यांने काढली होती. त्यावरुन दोन्ही टोळ्या एकमेकांसमोर आल्या आणि त्यानंतर बारच्या दिशेने गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर याच परिसरातील एका बारमध्ये भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची मुले रोहित खोपडे आणि अभिलाष खोपडे यांनीही तोडफोड करुन बारमालकाला मारहाण केली होती. त्यानंतर याच भागात जुलै २०१६ मध्ये गुंड राजा परतेकीच्या टोळीने सचिन सोमकुवर या युवकाचा गोळ्या घालून खून केला होता, या हत्याकांडाचा कटही लाहोरी बारमध्येच रचण्यात आला होता, असे तपासात निष्पन्न झाले होते.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

गेल्या अनेक दिवसांपासून लाहोरी बार चर्चेत आहे. नुकताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत हा लाहोरी बारमधून बाहेर पडला. त्यानंतर त्याच्या ऑडीने रस्त्यावरी पाच वाहनांना धडक देऊन हैदोस घातल्याची घटना घडली. अनेक गुन्हेगारी कटाचे किंवा हत्याकांडाचे मूळ लाहोरी बारपासून सुरु होते. लाहोरी बारमुळे नेहमी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, या बारवर राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे कोणतीही कारवाई होत नसल्याची माहिती समोर आली आहे.

बार पहाटेपर्यंत सुरु

बार पहाटेपर्यंत सुरु असतो, त्यामुळे हा बार नेहमी चर्चेत असतो. या बारमध्ये गुन्हेगारांची वर्दळ असते. यापूर्वीही येथे गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांची या बारवर विशेष ‘मेहरबानी’ आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारवर पोलीस कारवाई का करीत नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोलीस बारला आश्रय कशासाठी देतात, हे समजण्यापलीकडे आहे. पोलीस आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा – नितीन गडकरींचे देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा पत्र; जाणून घ्या नेमका विषय काय?

श्रीमंतांची मुले पहाटेपर्यंत बारमध्ये

लाहोरी बारमध्ये नेहमी राजकीय नेते, उद्योगपती, व्यावसायिक, शासकीय अधिकारी आणि श्रीमंत बापाची मुले नेहमी येतात. या बारला पोलिसांकडून सूट असल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शहरातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात लाहोरीत बसतात. याच परिसरात अंमली पदार्थ विक्री करणारे आणि देहव्यापार करणाऱ्या तरुणींचीही वर्दळ असते. त्यामुळे लाहोरी बार नेहमी चर्चेत असतो.