नागपूर : राज्याला हादरविणाऱ्या गोंदिया सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेवर गुदरलेल्या अमानुष प्रसंगांच्या मालिकेतील आणखी एक प्रकार उजेडात आला आहे. भंडाऱ्यातील लाखनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अक्षम्य बेजबाबदारपणा दाखवल्याने पीडित महिला आणखी दोन नराधमांच्या तावडीत सापडली आणि त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असे आता स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडित महिलेवर सलग दोन दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेच्या तपशिलातून पोलिसांच्या बेजबाबदारपणाच्या अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पीडित महिला ३० जुलैला बहिणीशी वाद झाल्याने घरातून एकटी बाहेर पडली होती. वाटेत श्रीराम उरकुडे (गोरेगाव) याने तिला कारमधून माहेरी सोडण्याचे आमिष दाखवून तिच्यावर गोरेगावच्या जंगलात बलात्कार केला आणि दुसऱ्या दिवशी मुंडीपार-मुरमाळीजवळील गावाजवळ सोडून दिले. एकटय़ा फिरणाऱ्या या महिलेची मुरमाळी येथील पोलीस पाटील महिलेने विचारपूस केली आणि तिची अवस्था बघून ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना बोलावले. लाखनी पोलिसांनी पीडितेला लाखनी पोलीस ठाण्यात नेले. तेथे तिची चौकशी केली. वास्तविक तिची अवस्था बघून रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी तसे केले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता रात्री १० नंतर पोलीस ठाण्यातून बाहेर पडली. त्यानंतर ती धर्मा नावाच्या ढाब्यावर गेली. बाजूला असलेल्या अय्याज अन्सारी या पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या कामगाराने तिला मदत करण्याचे आश्वासन दिले आणि अमित सारवे या मित्राला बोलावून घेतले. त्यांनी तिला दुचाकीवर बसवून जंगलात नेले आणि दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली. लाखनी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलेला रुग्णालयात दाखल केले असते तर तिच्यावर पुन्हा बलात्कार झाला नसता.

दरम्यान, या संदर्भात पोलिसांचे म्हणणे मात्र वेगळे आहे. पीडिता रात्री १०ला नव्हे तर पहाटेच्या सुमारास पोलीस ठाण्यातून नजर चुकवून बाहेर पडली, असा दावा पोलिसांनी केला. मात्र, अत्याचारग्रस्त महिला रात्री उशिरा पोलीस ठाण्यातून बाहेर जाणे हेही पोलिसांचेच अपयश ठरते. यावरून हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतले नव्हते, हे स्पष्ट होते. या महिलेची प्रकृती अतिशय गंभीर आहे.

दरम्यान, याप्रकरणी प्रतिक्रियेसाठी भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन

एखाद्या महिलेला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना कळवणे बंधनकारक असते. तिची पोलीस ठाण्यात नोंद घेणे आणि वैद्यकीय मदत करणे पोलिसांचे कर्तव्य असते. तिच्या तक्रारीची पोलिसांनी नोंद करणे आणि तिला मदत करणे अपेक्षित असते. मात्र, पोलिसांनी मार्गदर्शक सूचनांचे पूर्णपणे उल्लंघन केले.

या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना पोलीस कुणाच्या तरी दबावाखाली येत असल्याचे निदर्शनास येते. दबावामुळेच ते लोकप्रतिनिधींना पीडितेच्या नातेवाईकांना भेटू देत नाहीत.

– डॉ. मनीषा कायंदे, शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार

मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन

एखाद्या महिलेला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना कळवणे बंधनकारक असते. तिची पोलीस ठाण्यात नोंद घेणे आणि वैद्यकीय मदत करणे पोलिसांचे कर्तव्य असते. तिच्या तक्रारीची पोलिसांनी नोंद करणे आणि तिला मदत करणे अपेक्षित असते. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी मार्गदर्शक सूचनांचे पूर्णपणे उल्लंघन केल्याचे दिसते.

दोन आरोपी फरार

’कारधा पोलिसांनी दोन आरोपी अय्याज अन्सारी आणि अमित सारवे यांना अटक केली, तर अन्य दोन आरोपी फरार आहेत. मात्र,पोलिसांनी अद्यापपर्यंत मुरमाळी येथील महिला पोलीस पाटील यांचा जबाब घेतला नाही. पीडितेच्या बहिणीचाही जबाब पोलिसांनी घेतला नाही.

’पीडित महिलेला ज्या पोलीस वाहनातून लाखनी पोलीस ठाण्यात आणण्यात आले, त्या वाहनावरील चालक पोलीस कर्मचाऱ्यांचेही जबाब पोलिसांनी घेतलेले नाहीत.

’पीडित महिलेला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस वाहनाचे ‘लॉगबुक’ही पोलिसांनी ताब्यात घेतले नाही. यावरून पोलिसांचा तपासातील हलगर्जीपणा स्पष्ट होतो.

पोलीस अधीक्षकांची सारवासारव

‘पीडित महिला स्वत:चे नाव सांगण्यास तयार नव्हती. ती पत्ता आणि गावाचे नाव सांगत नव्हती. ती लाखनी पोलीस ठाण्यातून न सांगता निघून गेली,’ अशी सारवासारव भंडारा जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी केली़

पोलिसांचा दावा खोटा

पीडित महिला पहाटे नजर चुकवून पोलीस ठाण्यातून बाहेर गेल्याचा दावा लाखनी पोलिसांनी केला असला तरी ती रात्री १० वाजता बाहेर पडत असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध आहे. महिलेची अवस्था बघून तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाचा अंदाज पोलिसांना आला होता; परंतु जबाबदारी टाळण्यासाठी पोलिसांनी तिला बाहेर जाऊ दिले. त्यामुळेच तिच्यावर आणखी दोघांनी पुन्हा सामूहिक बलात्कार केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhni police station officials show irresponsibility in woman gang rape in bahandara zws
First published on: 08-08-2022 at 02:53 IST