मनीषनगर, बेसा-बेलतरोडीतील चित्र

‘न्यू नागपूर’ म्हणून ओळख असलेल्या मनीषनगर, बेसा-बेलतरोडी भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बघितले तर रस्ते नव्हे तर खड्डय़ांचा रस्ता म्हणावा, अशी स्थिती आहे. चालायलाही जागा नाही, इतकी खड्डय़ांची व्याप्ती आहे, येथून वाहने चालविताना करावी लागणारी कसरत अपघाताला आमंत्रण देणारी आहे. ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी या भागातील रस्ते मनस्ताप वाढवणारे आहेत.

वर्धामार्गाला लागून असलेल्या सीमावर्ती भागातील या वस्त्या आहेत. अतिशय झपाटय़ाने विस्तारलेला परिसर म्हणून त्याची ओळख आहे. म्हणूनच लोकांनी येथे प्लॉट, घरे आणि निवासी गाळे खरेदी केले. या भागात रस्ते बांधणीची कामेही झाली मात्र ती इतकी निकृष्ट आहेत की त्यावरून चालणे अवघड ठरावे. यंदाच्या पावसाळ्यात तर रस्ते शिल्लकच उरले नाहीत, खड्डय़ांचेच रस्ते झाले आहेत.

शताब्दी चौकातून बेसाकडे जातांना लोहार समाज भवनासमोरील रस्त्याच्या मध्यभागी पाच फूट लांब खड्डा पडला आहे. थोडे पुढे जाताच परत दोन मोठे खड्डे आहेत. हे खड्डे अलीकडच्या काळातले नसून गेल्या दोन वर्षांपासून आहेत.

मनीषनगर येथील जयंती मेंशन-३ समोर रस्त्याच्यामध्ये मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. त्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूला जवळपास १०० मीटर केवळ खड्डय़ांचा रस्ता आहे. पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत असून वाहनचालकाला खड्डय़ातूनच गाडी न्यावी लागते. विशेष म्हणजे, ही परिस्थिती गेल्या सहा महिन्यांपासून असली तरी त्या रस्त्याची डागडूजी करण्यात आली नाही. या रस्त्याला पर्यायी रस्ता दिला असून तोही तसाच आहे.

सोमलवाडा चौकातून मनीषनगरकडे येणारा रस्ताही पूर्णपणे खड्डेमय झाला असून दिवसेंदिवस त्या खड्डय़ांचा आकारही वाढत आहे. सोमलवाडा ते बेसा टी-पॉईन्टपर्यंतचा रस्ता अरुंद आहे, त्यातच खड्डे पडल्याने नागरिकांना कसरत करतच ये-जा करावी लागते. त्यामुळे या भागातील जनतेला दररोजचे छोटे-मोठे अपघात आता नवीन राहिलेले नाहीत.

हरिहरनगर ते बेलतरोडी शेवटच्या बस थांब्यापूर्वीपर्यंतचा प्रमुख मार्ग सिमेंटचा करण्यात आला असून त्याचा दर्जा निकृष्ट असल्याचे तेथील नागरिक सांगतात. गौरी ट्रेडर्ससमोरील पृथ्वीराज नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची स्थिती दयनीय आहे. मत्रीनगर, शिवसाई नगर, साकेत नगरात जाणारे रस्ते बिकट अवस्थेत आहेत, तर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. ओम हार्डवेअरपासून जयंतीनगरी-३ कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे असून वाहन कुठून चालवावे असा प्रश्न पडतो.

फडणवीस, बावनकुळेंच्या मतदारसंघातील वस्त्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर या विधानसभा मतदारसंघात मनीषनगरचा तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघात बेसा-बेलतरोडीचा समावेश आहे. मनीषनगरचा कायापालट करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिले होते. हीच भूमिका बावनकुळेंचीही बेसा-बेलतरोडीबाबत आहे हे येथे उल्लेखनीय.

मी दुचाकी चालवणे सोडले

बेसा भागातील रस्ते बघा, मग स्मार्ट सिटीच्या गोष्टी करा. आज नागरिकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. ज्येष्ठ नागरिकांना छोटय़ा-मोठय़ा गोष्टींसाठी नेहमी बाहेर जावे लागते. खड्डय़ातून गाडी चालवताना फार भीती वाटते. पावसामुळे खड्डय़ाची तीव्रता लक्षात येत नाही. त्यामुळे पडण्याची शक्यता असल्याने मी दुचाकी चालवणे सोडले आहे. उद्या काही झाले तर त्याला जबाबदार कोण?

– श्रीधर वाकोडे, बेसा