नागपूर : शहरातील १२ सराफा व्यावसायिकांना रविवारी लाखोंची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीवर सोमवारी तहसील पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
नागपूर जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी तडकाफडकी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संपर्क साधत सुरक्षेची मागणी केली होती. एन दिवाळीच्या तोंडावर मिळालेल्या या धमकीमुळे सराफा व्यापाऱ्यांत दहशत असतानाच पोलीस आयुक्तांनी सोमवारी तहसील पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले. या घडामोडीत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी देखील बिष्णोई टोळीकडून मिळालेल्या धमकीचा गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले.
काय म्हणाले गृहराज्यमंत्री पंकज भोयर
लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून मिळालेल्या धमकीनंतर सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीती आहे. या प्रकरणाततहसील पोलिसांनी अधिकृत गुन्हा दाखल केला आहे. त्याची सखोल चौकशी केली जात आहे. दहा ते १२ व्यापाऱ्यांना हे पत्र मिळाल्याने ते पाठवणाऱ्यांचा शोध घेतला जाईल. अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यानंतर २४ तासांच्या आत गुन्हेगारांना अटक झाली होती. संघटीत गुन्हेगार टोळ्यांकडून अशा नावाचा गैरवापर करत आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे हा खोडसाळपणा असण्याची शक्यता आहे. तरीही या प्रकरणात सखोल चौकशी केली जात आहे.
नेमके काय होतं धमकीच्या पत्रात….
इतवारी येथील सराफा ओळ आणि बजाजनगरातील काही सराफा व्यावसायिकांनाही काही तासांच्या अंतरात एका मागे एक धमकीच्या आशयाचे पत्र मिळाले. वहिच्या कागदावर हस्ताक्षरात लिहिलेली ही पत्रे टपालाद्वारे सराफा व्यापाऱ्यांना पाठवण्यात आहेत. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करत धमकी देणाऱ्याने सराफा व्यावसायिकांना दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली आहे. यात धमकी देणाऱ्याने व्यापाऱ्यांना तीन दिवसांची मुदत दिली आहे. या काळात पैशांची व्यवस्था केली नाही तर आप्तेष्टांसह त्याची किंमत मोजावी लागेल, तुम्ही कलियुगातले कौरव आहात. जसा टायगर श्रॉफवर गोळीबार केला तसात तुमच्यावरही करेल. मी आतापर्यंत चार खून केले आहेत. पोलीसांना मदत मागाल तर परिणाम चांगले होणार नाहीत, अशा आशयाचा मजकूरही धमकी देणाऱ्याने हस्ताक्षरात लिहिला आहे.
सराफा संघटनेकडून सुरक्षेची मागणी …
जिल्हा सराफा व्यापारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजेश रोकडे यांनी तडकाफडकी या संदर्भात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संपर्क साधत त्यांना धमकीच्या पत्राची प्रत सादर केली. सराफा असोसिएशनने पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करत सुरक्षेचीही मागणी केली.
