यवतमाळ : सत्तेसाठी बच्चू कडू यांनी गुवाहाटी वारी केली. पन्नास खोके एकदम ओके होत पर्यंत त्यांना शेतकऱ्यांची कधीच आठवण झाली नाही. आता मात्र सत्ता जाताच बच्चू भाऊंना शेतकऱ्यांची आठवण आली आहे. शेतकऱ्यांप्रती त्यांना आलेला हा पुळका फक्त पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी असून शेतकऱ्यांनी अशा नेत्यांपासून सावध राहावे, असे आवाहन शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी केले.
शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. कडू यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत ते आंदोलन थांबवणार नाहीत. त्यांच्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यवतमाळचे शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी मात्र त्यांच्यावर टीका करीत गुवाहाटी येथे जातांना त्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली नव्हती काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
शेतकरी विरोधी निती राबविणाऱ्या सरकारमध्ये बच्चू कडू सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर त्यांना मंत्रीपद सुध्दा देण्यात आले होते. या दरम्यान त्यांनी कधीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही. सत्ता जाताच त्यांना आता शेतकऱ्यांची आठवण झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते सरकारवर दबाव निर्माण करीत असले तरी त्यामागे सत्तेचे राजकारण आहे. एकदा सत्ता प्राप्त झाली की नेत्यांना शेतकऱ्यांच्या विसर पडतो त्यामुळे अशा सत्तेची लालसा असणाऱ्या नेत्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन सिकंदर शहा यांनी केले.
शेतकरी विरोधी नितीचे समर्थन
केंद्र तसेच राज्यातील भाजपचे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यांची ध्येयधोरणे ही शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी आहे. सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना कोटयवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. असे असतांना बच्चू कडू यांनी कधीच सरकारच्या नीतीचा विरोध केला नाही. उलट मंत्रीपदासाठी ते सरकारवर दबाव निर्माण करीत राहिले. त्यांची गुवाहाटी वारी आणि खोक्याचे राजकारण सर्व परिचीत झाले आहे. त्यामुळे बच्चू कडू यांची विश्वासाहर्ता कमी झाली आहे. बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा स्वहित आणि सत्ता महत्वाची वाटत असल्याचेही सिकंदर शहा यांनी म्हटले आहे.