एसटी आगारात खासगी बस प्रवेशाला नियमाचा अडथळा

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्य़ातील प्रवाशांचे बुधवारीही हाल कायम होते. दुपारी एसटीच्या आगारात काही खासगी बसला प्रवेश दिला गेला. परंतु काही वेळातच पोलिसांनी २०० मीटर परिसरात खासगी बसला प्रतिबंधाच्या निर्णयावर बोट ठेवल्याने पेच निर्माण झाला. दरम्यान, महामंडळाने बुधवारी आणखी कठोर निर्णय घेत संपाकरिता कर्मचाऱ्यांना चिथावणाऱ्या ४६ आंदोलक नेत्यांचे निलंबन केले. त्यामुळे दोन दिवसांतील जिल्ह्य़ातील निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ६४ वर पोहचली आहे.

निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये घाटरोड आगारातील ९, काटोल आगारातील १०, रामटेक आगारातील १०, इमामवाडा आगारातील ७, गणेशपेठ आगारातील १० अशा एकूण ४६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांनी आंदोलनादरम्यान सेवेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना चिथावून संपासाठी बाध्य केले. यापैकी काहींचे संपासाठी पुढाकार घेतल्याचे छायाचित्र तर काहींच्या चित्रफिती प्रशासनाकडे पोहोचल्या. त्यामुळे  हे निलंबन केल्याचे एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

एसटी कर्मचारी सेवेवर यायला तयार नसल्याने हा संप आता जास्तच चिघळण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्व बस आगारांवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. संपामुळे प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून परिवहन विभागाने मंगळवारी आरटीओ, एसटी अधिकारी, पोलिसांसह इतर विभागांना सोबत घेत नियंत्रण कक्षही तयार केला. दुपारी एसटीच्या गणेशपेठ आगारात काही खासगी बस लावण्यात आल्या. परंतु काही वेळाने पोलिसांनी  एसटीच्या २०० मीटर परिसरात खासगी ट्रॅव्हल्स लावता येत नसल्याच्या नियमावर बोट ठेवले. त्यामुळे पेच निर्माण झाला. त्यानंतर या बस आगाराबाहेरूनच प्रवाशांना घेत  होते. येथे वाहतूक कोंडी होत असल्याचेही चित्र होते. 

निलंबनाचे आदेश पोस्टाने घरी एसटीचे कर्मचारी संपावर असले तरी काही ठिकाणी त्यांनी मंडप टाकून ठिय्या देणे सुरू केले आहे. एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडून बुधवारी ४६ आणि मंगळवारी निलंबित केलेल्या १८ अशा एकूण ६४ कर्मचाऱ्यांचे निलंबन आदेश त्यांच्या घरच्या पत्त्यावर पाठवण्यात आले.

चार दिवसांत १.८० कोटींचा फटका

कर्मचारी संपामुळे नागपूर विभागाला चार दिवसांत तब्बल १.८० कोटींचा फटका बसला. यापैकी ४८ लाख १९ हजार ८१५ रुपयांचे नुकसान बुधवारी झाले. पहिल्या दिवशी रविवारी ३७ बस धावल्याने ३५ लाखांचा फटका बसला होता. त्यानंतर जिल्ह्य़ातील आठ आगारातून एकही बस सुटत नसल्याने हे नुकसान आणखी वाढले.

नियंत्रण कक्षात एकही तक्रार नाही

नागपूर शहर व ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयासह पोलीस व एसटीच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत मंगळवारी एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला. त्यात शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रवाशांसाठी २५६१६९८/ २५४३३१२, पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय परिसरातील प्रवाशांसाठी २९५६७२५ आणि ग्रामीणच्या प्रवाशांसाठी २९५६३४८/ २९५६३२५ हे क्रमांक उपलब्ध केले गेले. परंतु या क्रमांकावर एकही तक्रार आली नसल्याचे परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आले.  प्रवाशांनी मात्र हे क्रमांक बस आगारांवर ठळकपणे का लावले जात नाही, हा प्रश्न उपस्थित केला. 

बाह्य़रुग्णांसाठीही रुग्णवाहिका द्या

सध्या गंभीर रुग्णांना शासकीय रुग्णालयांत  जायचे असल्यास १०८ क्रमांकाची शासकीय रुग्णवाहिका नि:शुल्क मिळते. परंतु गेल्या काही दिवसांपासून एसटीच्या संपामुळे रुग्णांना शासकीय रुग्णालयांत यायला अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेकांचा उपचार थांबला आहे. दरम्यान, संप काळापर्यंत शासकीय रुग्णालयात  येणाऱ्या आंतरुग्णांसह बाह्य़ रुग्णांनाही या रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी शासनाने आदेश काढावे, अशी मागणी नागपुरातील मेडिकल, मेयो, दंत, शासकीय आयुर्वेद रुग्णालयांतील रुग्णांकडून होत आहे.