वर्धा : अजितदादा पवार यांचे निधन अनेकांना चटका लावून जात आहे. तश्या आठवणी आता अनेक नेत्यांना हळव्या करीत आहे. दादा असते तर माझे काम पटकन झाले असते, असे बोलणारे पुढे येत आहे. त्यात माजी खासदार रामदास तडस हे अग्रणी ठरत आहे.त्यांची मंगळवारी अजितदादा यांच्यासोबत मुंबईत भेट झाली. मंत्रिमंडळ बैठक झाली आणि दादा बाहेर निघत असतांना दादा तडस यांना म्हणाले की आधी ज्यांना वेळ दिली त्यांना भेटतो.
माजी खासदार रामदास तडस हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दोन वेळा आमदार राहून चुकले. या काळात एकदा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतांना तडस यांना बाका प्रसंग आला होता. त्यावेळी देवळी पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसीची सत्ता होती. पालिका मुख्याधिकारी बदलावा म्हणून लोकांनी मागणी सूरू केली होती. मोठ्या प्रमाणात आंदोलन सूरू झाले. आमदार असलेल्या तडस यांची कसोटी लागली.
त्यांनी मुंबई गाठली. राष्ट्रवादीचे नेते म्हणून त्यांनी अजितदादा यांची भेट घेतली. त्यापूर्वी मुख्यमंत्री चव्हाण यांना निवेदन देण्यात आले होते. तडस स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटले. हा अधिकारी नकोच असे नमूद केले. जनता नाराज आहे असे सांगितले. पण मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की मला प्रथम देवळी आमदार रणजित कांबळे यांना विचारावे लागेल. त्यांनी ओके केले तरच मी बदली करणार. तेव्हा मी अजितदादा यांच्याकडे गेलो. समस्या सांगितली. तेव्हा अजितदादा जे म्हणाले ते माझ्या कायम स्मरणात राहील. अहो रामदासजी, अधिकारी नव्हे तर लोकशाहीत जनता महत्वाची असते. त्यांना दुखावून आम्ही राज्य कसे करणार. असे म्हणत अजितदादा यांनी थांबा म्हटले. १० मिनिटात ते हातात कागद घेबून आले. तो पालिका मुख्याधिकारी यांच्या बदलीचा आदेश होता. मला तर भावना आवरेनाश्या झाल्या. दादा तुम्ही ग्रेट असे म्हटले आणि तडक वर्ध्यासाठी निघालो, अशी आठवण रामदास तडस सांगतात.

