scorecardresearch

काँग्रेसची फजिती!; उमेदवारीबाबत धरसोडवृत्तीचा नागपूरमध्ये फटका

भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा १७५ मतांनी दणदणीत पराभव केला.

नागपूर मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विजय मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.

उमेदवारीबाबत धरसोडवृत्तीचा नागपूरमध्ये फटका

नागपूर: विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या नाराज नगरसेवकाला पक्षात घेऊन त्याला उमेदवारी देणे आणि मतदानाच्या एक दिवसाआधी त्याच्याऐवजी अपक्षाला र्पांठबा देऊन त्याला ‘निवडणूक रणनीती’ संबोधणे हे नागपुरात काँग्रेसच्या अंगलट आले. भाजपने या निवडणुकीत काँग्रेसवर एकतर्फी मात करीत जागा पक्षाकडे कायम राखण्यात यश मिळवले. बावनकुळे यांच्या आमदारकीमुळे तेली समाजाची नाराजी दूर होईल व त्याचा पक्षाला फायदा होईल, असे गणित भाजपकडून मांडले जात आहे. 

भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा १७५ मतांनी दणदणीत पराभव केला. बावनकुळे यांचा हा विजय जिल्ह्यात दोन वर्षांपासून विविध निवडणुकांमध्ये होत असलेल्या भाजपच्या पराभवाची मालिका खंडित करणारा जसा आहे तसाच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांचे मनोबलही उंचावणाराही ठरला आहे.

विशेष म्हणजे भाजपमधील असंतुष्टाला हाती धरून या पक्षाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याच्या  प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाला या निवडणुकीत जोरदार चपराक बसली. उमेदवार आयात करताना त्याची राजकीय ‘क्षमता’ न बघता निवडणुकीत चमत्कार घडवून  आणण्याचा दावा करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवरही या पराभवामुळे नामुष्की ओढवली.

मर्यादित मतदार असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडे विजयासाठी आवश्यक संख्याबळ होते. त्यांनी बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. पण भाजपमधून आयात डॉ. रवींद्र भोयर यांच्यासाठी काँग्रेसने तो नाकारला.

भोयर भाजपची मते फोडतील असा दावा काँग्रेस नेते करीत होते. पण त्यांच्यात ही क्षमता नाही व त्यासाठी लागणारी ‘रसद’ही नव्हती. ते रिंगणात राहिल्यास काँग्रेस गटातील आहे ती मतेही मिळणार नाहीत हे लक्षात आल्यावर मतदानाच्या १२ तासांपूर्वी काँग्रेसने ऐनवेळी अपक्ष उमेदवाराला र्पांठबा देण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला. पण तो किती चुकीचा होता हे काँग्रेस गटातील मतफुटीतून दिसून येते. काँग्रेस गटातील ५० हून अधिक मते फुटली. भोयर यांना मिळालेले एक मत त्यांच्याकडून मते फोडण्याची केली जाणारी अपेक्षा किती फोल होती हे स्पष्ट करणारे आहे.

ही निवडणूक भाजपने एकसंधपणे सर्वशक्तीने लढली. त्यामुळे बावनकुळे यांना अपेक्षेपेक्षा ४० ते ५० मते अधिक मिळाली. स्वत: फडणवीस मतदानाच्या एक दिवस आधी नागपुरात तळ ठोकून होते. दुसरीकडे काँग्रेसमध्ये नेत्यांमध्ये विसंवाद होता. पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या एककल्ली कारभारापुढे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह इतर नेत्यांनी नांगी टाकल्याचे चित्र होते. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि सेनेचे अस्तित्व शेवटपर्यंत कुठेच दिसून आले नाही.

बावनकुळे यांच्या विजयाने फायदा ?

विधानसभा निवडणुकीत भाजपने बावनकुळे यांना उमेदवारी नाकारल्याचा पक्षाला सामाजिक फटका बसला होता. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. बावनकुळे यांना उमेदवारी नाकारल्याने तेली समाजातील नाराजीचा फटका बसल्याची कबुली भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी खासगीत दिली होती. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बावनकुळे यांना आमदारकी देऊन पक्षाने राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

निकाल

एकूण मतदार-५५९

झालेले मतदान-५५४

वैध मते-५४९

चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)-३६२

मंगेश देशमुख (काँग्रेस समर्थित

अपक्ष)-१८६

डॉ.रवींद्र भोयर-१

हा सर्व भाजप कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा विजय आहे. विधान परिषदेत जिल्ह्यातील विकासाचे मुद्दे रेटून धरू व या भागाच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधू. -चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे विजयी उमेदवार

ऐनवेळी उमेदवार बदलने ही निवडणूक रणनीती होती. भाजपने घोडेबाजार करून ही निवडणूक जिंकली. -नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Legislative council elections congress contempt bjp candidate chandrashekhar bawankule congress sponsored independent candidate akp

ताज्या बातम्या