गोंदिया: तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे शुक्रवार ९ जानेवारी रोजी तीन वर्षात हियांश या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात बिबट्याची भीती पसरली आहे. जंगला लगतच्या अनेक गावांमधील दैनंदिन जीवन विस्कळित झाले असून, भीतीपोटी पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे बंद केले आहे.
तिरोडा तालुक्यातील खडकी, डोंगरगाव, निमगाव, बुचाटोला, रुस्तमपूर ही सर्व गावे घनदाट जंगलाच्या सान्निध्यात वसलेली असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर नेहमीच असतो. त्यातच बालकाचा बळी घेणारा बिबट्या नरभक्षी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर अनेक पालकांनी पाल्यांना घराबाहेर पडण्यासही मज्जाव केला आहे. परिणामी शाळा, अंगणवाड्या तसेच शिकवणी वर्ग ओस पडल्या आहे.
वनविभागाचे पथक बिबट्याच्या शोधासाठी मोहीम राबवत आहे. जंगल परिसरात पिंजरे लावणे, गस्त वाढवणे तसेच ठिकठिकाणी पायवाटांवर लक्ष ठेवण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्या बिबट्याचा ठोस माग लागलेला नाही. पण या करिता दिवसरात्र गस्त केली जात आहे. नवेगावबांध येथील १० सदस्यांची आरआरटी टीम, भंडाऱ्याची आठ सदस्यांची आरआर टीम, एनएनटीआर वडेगाव येथील दहा सदस्यांची टीम तसेच तिरोडा प्रादेशिक कार्यालयातील वीस सदस्यां-ची विशेष टीम संयुक्तपणे कार्यरत आहे. या सर्व पथकांकडून दिवसरात्र गस्त, शोधमोहीम व नागरि-कांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे रस्ते निर्मनुष्य झाले असून शेताकडे जाणे, बाजारहाट करणे, मजुरीसाठी बाहेर पडणे यावरही मर्यादा आल्या आहेत.
बिबट्या परिसरात, की अन्यत्र …
वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी चार पिंजरे व दोन कृत्रिम गोठे तयार केले असून, तेथे कोंबड्या आणि शेळ्या , गायी ठेवल्या आहेत. मात्र चार दिवस लोटूनही बिबट्या त्याकडे फिरकलेला नाही. यामुळे बिबट्या परिसरातच आहे, की अन्यत्र निघून गेला आहे हे समजेनासे झाले आहे. बिबट्या मोकाट असल्याने मात्र परिसरातील नागरिक धास्तीत वावरत आहेत.
नजर ठेवण्यासाठी आणखी २० कॅमेरे
बिबट्या चार दिवस लोटूनही हाताबाहेर असल्याने वनविभागाचे सर्व प्रयत्न फसत असल्याचे दिसत आहे. अशात आता वनविभागाने बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी आणखी २० कॅमेरे लावण्यास सुरुवात केली आहे. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बिबट्यावर पाळत ठेवली जाणार. बिबट्या मोकाट असल्याने खडकी-डोंगरगाववासीय आताही दहशतीतच वावरत आहेत. बिबट्यावर पाळत ठेवण्यासाठी १५ टॅब कॅमेरे लावले असून, त्यातही बिबट्या दिसून आलेला नाही. अशात आता नागझिरा येथून २० टॅब कॅमेरे मागवून ते लावणार असल्याचे तिरोड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रविकमल भगत यांनी सांगितले.
