नागपूर : वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात प्रत्येक दिवस नवा असतो. काही क्षण दुःखद असतात, तर काही आयुष्यभर स्मरणात राहणारे. तुमसर वनपरिक्षेत्रात आज अशाच दोन टोकाच्या घटनांचा अनुभव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकाच दिवशी घेतला.
घटना नेमकी काय होती
तुमसर वनपरिक्षेत्रातील येरली गावात एका विहिरीत सुमारे सहा महिन्यांची बिबट्याची दोन पिल्ले पडल्याची माहिती प्राप्त झाली. वनविभागाच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अत्यंत काळजीपूर्वक दोन्ही पिल्लांना सुरक्षित बाहेर काढले. त्याच सायंकाळी त्यांच्या आईसोबत पुनर्मिलनाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बराच वेळ प्रतीक्षा करूनही बिबट मादी त्या ठिकाणी आली नाही. त्यामुळे पिल्लांना सुरक्षित ताब्यात ठेवण्यात आले.
त्याचवेळी आणखी एक दुःखद घटना
दुपारीच दुसरी अत्यंत गंभीर घटना घडली. गोबरवाही येथील एका व्यक्तीवर सोदीपुर जंगल परिसरात गुरे चारत असताना वाघाने हल्ला करून त्यांचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणणे, आवश्यक पंचनामा करणे आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविणे, या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यात आल्या. या धावपळीच्या दिवसातही वनविभागाने बिबट्याच्या पिल्लांच्या पुनर्मिलनाची आशा सोडली नाही. सायंकाळी सुमारे ७.०० वाजता पिल्ले ज्या परिसरात आढळली होती, त्याच परिसरातील जंगलात त्यांना एका सुरक्षित पिंजऱ्यात ठेवून आईच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले.
…आणि अखेर तो हृदयस्पर्शी क्षण आला!
रात्री सुमारे ९.३० वाजता बिबट मादी सावधपणे पिंजऱ्याजवळ आली. आईची चाहूल लागताच दोन्ही पिल्लांनी आपल्या नैसर्गिक आवाजात प्रतिसाद दिला. खात्री होताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत संयमाने पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. क्षणार्धात दोन्ही पिल्ले आईकडे धावत गेली आणि बिबट मादी त्यांना सोबत घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेली.
निसर्गाने पुन्हा एक मायेचं अनमोल धडा दिला
आई आणि पिल्लांचे हे यशस्वी पुनर्मिलन पाहून उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. दोन दिवसांची ताटातूट संपली होती आणि निसर्गाने पुन्हा एकदा मायेचा अनमोल धडा शिकवला होता. वन्यजीव संवर्धन हे केवळ बचावकार्य नसून, निसर्गाचा समतोल आणि वन्यजीवांचे नैसर्गिक जीवन अबाधित ठेवण्याची एक संवेदनशील जबाबदारी आहे. तुमसर वनपरिक्षेत्रातील हे यशस्वी पुनर्मिलन त्याचेच एक प्रेरणादायी उदाहरण ठरले, असे सहाय्यक वनसंरक्षक रितेश भोंगाडे यांनी सांगितले.
