नागपूर : सागवानाच्या झाडावर बसलेले माकड आणि त्याचा पाठलाग करणाऱ्या बिबट्या.. जीव वाचवण्यासाठी माकडाने झाडावरुन थेट जवळच्या डीपीवर उडी घेतली. त्याच्या मागोमाग बिबट्यानेही डीपीवर झेप घेतली. मात्र, पुढच्या क्षणी बसलेल्या विजेच्या धक्क्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. चिमूर तालुक्यातील पिंपळगाव खण परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबट उडाली आहे.
माकडाने घेतली डीपीवर उडी
पिंपळगाव खाण परिसरात मोहन धारणे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात ही घटना घडली. शेतातील सागवानाच्या झाडावर एक माकड बसले होते. याचदरम्यान बिबट्याची नजर त्याच्यावर पडली. बिबट तसाही झाडांवर लवकर चढणारा वन्यप्राणी. त्यामुळे माकडाचा पाठलाग करत बिबट्या झाडावर चढला आणि त्याने बंदरावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. वाघ किंवा बिबट जवळ असेल तर सर्वात आधी सूचना देणारा माकडच असतो. येथेही माकडाला बिबट्याची चाहूल लागली. बिबट जवळ येत असल्याचे लक्षात येताच माकडाने जीव वाचवण्यासाठी सागवानाच्या झाडावरुन उडी घेतली. येथे मात्र उडी मारताना त्याचा नेम चूकला. सागवानाच्या झाडापासून अवघ्या दहा फूटावर असलेल्या वीज वितरणाच्या डीपीवर ते माकड जाऊन पडले. बिबट्यानेही त्याचा पाठलाग सोडला नाही आणि माकडाच्या पाठोपाठ त्यानेजी वीजेच्या डीपीवर उडी घेतली.
अवघ्या काही क्षणात मृत्यूने कवटाळले
वीज वितरणाच्या डीपीवर पोहोचताच माकड आणि बिबट या दोघांचाही वीजतारांशी संपर्क झाला. त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि घटनास्थळीच माकडाचा आणि त्याचा पाठलाग करणाऱ्या बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याचा शिकारीचा प्रयत्न फसला आणि शिकारीच्या नादात त्याला आपला जीव गमवावा लागला. तर माकडाचा बिबट्यापासून स्वत:ची सुटका करुन घेत जीव वाचवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. परिणामी दोघांनाही आपला जीव गमवावा लागला. घटना लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पंचनामा करून मृतदेह खडसंगीला
वन भागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन या घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर डीपीजवळ अडकलेल्या बिबट्याचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह खडसांगी येथे नेण्यात आला. दरम्यान, बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण आणि विद्युत प्रवाहाशी संबंधित परिस्थितीची वनविभागाकडून पाहणी करण्यात येत आहे. या घटनेप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
